‘बाबुर्डी घुमट’मध्ये मविआला धक्का, कर्डिले गटाचा दणदणीत विजय | पुढारी

‘बाबुर्डी घुमट’मध्ये मविआला धक्का, कर्डिले गटाचा दणदणीत विजय

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत माजी आमदार शिवाजी कर्डिले गटाचे भाऊसाहेब लांडगे यांनी महाविकास आघाडीची पंधरा वर्षांची सत्ता उलथवून टाकत निर्विवाद वर्चस्व मिळविले आहे. या निवडणुकीत 9 पैकी 6 जागा मिळवून कर्डिले गटाने दणदणीत विजय मिळविला. बाबुर्डी घुमट ग्रामपंचायतीवर गेल्या पंधरा वर्षांपासून महाआघाडीचे जनार्दन माने यांचे वर्चस्व होते.

या निवडणुकीत परिवर्तन घडविण्यासाठी कर्डिले गटाचे भाऊसाहेब लांडगे यांनी गावातील ज्येष्ठांना एकत्र करत सत्ताधार्‍यांविरोधात मोट बांधली. सत्ता मिळविण्यासाठी दोन्ही गटांनी कंबर कसली होती. सत्तेसाठी सर्व नितीचा वापर करण्यात आला. दोन्ही गटांकडून नातेगोते व भावकीत परस्परांविरोधात उमेदवार मैदानात उतरविले होते. ग्रामपंचायतीच्या 9 जागांसाठी 19 उमेदवार निवडणुकीच्या रणांगणात उतरले होते.

ग्रामपंचायतीसाठी 92 टक्के मतदान झाल्याने वाढीव मतदानाचा लाभ कर्डिले गटाला झाल्याचे दिसून आले. ग्रामपंचायतची सत्ता खेचून आणण्यासाठी भाऊसाहेब लांडगे यांच्यासह महादेव गवळी, रामलाल मोरे, प्रकाश भगत, राजेंद्र ननवरे, भास्कर परभाणे, संतोष चव्हाण यांच्या योग्य नियोजनाचे फळ मिळाले. मतमोजणीचा निकाल घोषित झाल्यानंतर भाऊसाहेब लांडगे समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला.

विजयी उमेदवार पुढील प्रमाणे
नमिता राहुल पंचमुख , वंदना भाऊसाहेब चव्हाण , तान्हाजी रंगनाथ परभाणे , बबन दत्तु लांडगे , ज्योती बाबासाहेब परभाणे , शहाबाई तुकाराम गुंजाळ , ( विरोधी विजयी उमेदवार ) जनार्दन सदाशिव माने , मैनाबाई दत्तु परभाणे , ज्योती हरिभाऊ फसले.

Back to top button