नगर : धुव्वाधार पावसाने झाडे कोसळली

नगर : पुढारी वृत्तसेवा : बुधवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. दीड तास झालेल्या पावसाने शहरात झाडे उन्मळून पडली. तर, रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही काळ शहरातील जनजीवन ठप्प झाले होते. जोरदार पावसाने दिल्लीगेट, नालेगाव, सावेडी, बोल्हेगाव, सावेडी उपनगर आदी भागात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
रस्त्यावरील पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. दरम्यान, पावसाने शहरातील अनेक ठिकाणीची झाडे उन्मळून पडली. त्यात आयुक्त डॉ. प्रदीप जावळे यांच्या बंगल्यातील झाड उन्मळून पडले. साई कॉलनी, माधना कॉलनी भूतकरवाडी, हॉटेल वैभव चौक येथील झाडे कोसळली. हॉटेल वैभव चौकातील रस्त्यावर पडलेले झाड रात्री साडेबारा वाजता उद्यान विभागातील कर्मचारी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक बाळासाहेब विधाते यांनी रस्त्यावरील झाडे हटविण्याचे काम केले.
दरम्यान, जोराच्या पावसाने सीना नदीला पहिल्यांदा पूर आला वसंतटेकडी येथील आयुक्त डॉ. प्रदीप जावळे यांच्या बंगल्यातील झाड उन्मळून पडले. त्याची उद्यान विभागाच्या कर्मचार्यांनी दखल घेत विजय कुलाळ, गणेश दाणे, रामा हुच्चे आदींनी झाड तत्काळ हटविले.