वांबोरीत ढगफुटी, शेतातील उभी पिके भुईसपाट | पुढारी

वांबोरीत ढगफुटी, शेतातील उभी पिके भुईसपाट

वांबोरी : पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरात वादळी वार्‍यासह अचानक झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने परिसरात सगळीकडेच जलप्रलय झाला. गुरुवारी रात्री उशिरापर्यंत वांबोरीचा इतर गावांशी संपर्क तुटला. या पावसामुळे परिसरातील सर्व शेतकर्‍यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकर्‍यांमधुन केली जात आहे.
वांबोरी मंडल कृषी क्षेत्रामध्ये कात्रड, गुंजाळे, वांबोरी, उंबरे, कुक्कडवेढे, खडांबा, धाम्बोरी व बाभळगाव या परिसरामध्ये बुधवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास मेघगर्जनेसह काळाकुट्ट ढगांमधून अचानक बरसलेल्या जलधारांमुळे काही मिनिटांतच संपूर्ण परिसरात पाणीच- पाणी केले. अचानक झालेल्या या जलप्रलयामुळे शेतातील सोयाबीन, कापूस, तूर, मुग, मका, बाजरी व कांद्यासह जनावरांचा चारा कडवळाचे पीक संपूर्णपणे भुईसपाट झाल्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

या नुकसानीने परिसरातील बळीराजा अक्षरशः हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे. हातातोंडाशी आलेले पीक पुन्हा एकदा निसर्गाच्या लहरीपणामुळे भुईसपाट झाले आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे कृषी क्षेत्र अडचणीत आले आहे. शेतमालाला भाव नाही. अनेक अडचणींना तोंड देत मोठ्या अपेक्षेने शेतकर्‍यांनी आपल्या शेतामध्ये पीकं उभी केली होती. परंतु, बुधवारी झालेल्या ढगफुटी सदृश पावसाने शेतातील सगळी पिके अक्षरशः भुईसपाट झाले आहेत.अगोदर कोरानाचे सावट अन् आता निसर्गाच्या लहरीपणाने कहर केला.

वांबोरी मंडळामध्ये उपलब्ध आकडेवारीनुसार सुमारे 84 मिलीमीटर पाऊस नोंदविला गेला. ज्या शेतकर्‍यांनी पीक विमा भरलेला असेल, अशा शेतकर्‍यांनी संबंधित विमा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या नंबरवर पीक नुकसानीची तक्रार दाखल करावी, असे वांबोरी मंडळ कृषी अधिकारी विनया बनसोडे यांनी केले आहे.

वांबोरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचा त्वरित पंचनामा करून, नुकसान भरपाई शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग करावी.
– उदयसिंह पाटील (माजी अध्यक्ष, डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे कारखाना.)

Back to top button