सीना नदी पाण्यावर फेसाचे आच्छादन | पुढारी

सीना नदी पाण्यावर फेसाचे आच्छादन

वाळकी : ज्ञानदेव गोरे : नगर शहर परिसरात बुधवारी (दि.3) रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सीना नदीला पूर आला होता. मात्र, नदी पात्रात केमिकलयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात सोडले जात असल्याने, नगर तालुक्यातील शिरढोणच्या शिवारात पहाटेपासून नदीवर पांढर्‍या शुभ्र फेसाचे आच्छादन पाहावयास मिळाले. केमिकलयुक्त पाण्यामुळे हा फेस मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला असून, त्यामुळे नगरसह कर्जत तालुक्यातील शेती, तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीत केमिकलयुक्त पाणी सोडले जात असल्याने नदीवर पांढर्‍या शुभ्र फेसाचे आच्छादन निर्माण होत आहे. शहरातून वाहणारी सीना नदी किती प्रदूषित आहे, हे या फेसावरून लक्षात येत आहे. याआधी अनेक वेळा असा फेस तयार झाला आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. नगर एमआयडीसी परिसरातील छोट्या-मोठ्या ओढ्यानाल्यात केमिकलयुक्त पाणी सोडल्याने, हे पाणी सीना नदीला येऊन मिळते. पुढे हे पाणी नगर, कर्जत, जामखेड तालुक्यात नदीद्वारे वाहत जाते. या प्रदूषणाकडे या आधी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी प्रदूषणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करून याकडे लक्ष वेधले होते.

सीना नदीवर कर्जत तालुक्यात निमगाव गांगर्डा येथे मोठे धरण आहे. या धरणाच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक गावांना पिण्याचे, तसेच शेतीसाठी पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र, जर केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी जात असेल तर, भविष्यात येथील शेतकर्‍यांची जमीन खराब होऊ शकते आणि त्यांच्या आरोग्यावरही घातक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या केमिकलयुक्त पाण्याचा शोध लावून, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात
नगर तालुक्यातील बुरुडगाव, वाळुंज, पारगाव, शिराढोण, दहिगाव, साकत, वाटेफळ, रुईछत्तीशी, हातवळण आदी गावे सीना नदीलगत वसलेली आहेत. यातील बहुतांशी गावात पिण्यासाठी बुर्‍हाणनगर योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मध्यंतरी बर्‍याच वेळा पाईपलाईन फुटल्याने या गावांचा पाणीपुरवठा अनेक दिवस विस्कळीत झाला होता. त्यामुळे ग्रामस्थांना विहिरीतील पाण्यावर तहान भागवावी लागली. मात्र, नदीचे पाणी जमिनीत मुरून विहिरीत येत असल्याने अनेकांचे आरोग्य बिघडले होते.

नगर शहरातून वाहणार्‍या सीना नदीत औद्योगिक वसाहतीतील केमिकलयुक्त पाणी सोडले जाते. त्यामुळे पाणी दूषित होत असल्याने नदीची गटार झाली आहे. मध्यतंरी वाकोडी-वाळकी रस्त्यावरील सीना नदीच्या पाण्यातील फेस रस्त्यावर आल्याने येथील वाहतूक ठप्प झाली होती. याबाबत महापालिकेशी चर्चा केली होती. मात्र, महापालिका याकडे दुर्लक्ष करत आहे. दूषित पाण्यामुळे नदी काठच्या गावांतील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
                                                             -संदेश कार्ले माजी जि.प. सदस्य

Back to top button