बोधेगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

बोधेगाव परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

बोधेगाव : पुढारी वृत्तसेवा : बोधगाव परिसरात चोरट्यांनी दहशत निर्माण करीत धुमाकूळ घातल्याने ग्रामस्थांमध्ये भीती निर्माण झाली आहे. भगवानगड रस्त्यालगत बोधेगावपासून दोन किलोमीटर अंतरावरील गमे वस्ती आणि गर्जे वस्तीवर चोरट्यांनी ग्रामस्थांना मारहाण करून सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम लांबविली. गर्जे वस्ती येथील अंबादास भानुदास गर्जे व त्यांची पत्नी लताबाई रात्री जेवण करून अंगणात झोपले होते. पहाटे तीनच्या दरम्यान पाऊस आल्याने ते घराचा दरवाजा उघडून आत जात असताना अचानक तीन ते चार चोरटे आले. त्यांनी त्यांना दारातच अडवून घरातील सोने, रोकड मागितली.

त्यांनी देण्यास नकार दिल्यावर त्यांना काठी व लोखंडी गजाने मारहाण केली. चाकूचा धाक दाखवून सोन्याचांदीचे दागिने व राख रक्कम असा 21 हजारांचा ऐवज लुटून नेला. त्यानंतर चोरट्यांनी शंकर माणिकराव गमे यांच्या स्वयंपाक घराच्या दरवाजातून आत प्रवेश करून कपाटाची उचकापाचक त्यातील 30 हजार रुपये काढून घेतले. दुसर्‍या खोलीत झोपलेले शंकर गमे, त्यांची पत्नी व मुले चोरट्यांच्या आवाजाने जागे झाले. चोरट्यांनी त्यांच्या दरवाजाला जोरात धक्के देऊन दरवाजा उघडा नाही तर तुम्हाला खलास करू, अशी दमबाजी केली. पण त्यांनी दरवाजा उघडला नाही.

त्यानंतर शंकर गमे यांनी बोधेगाव पोलिस दूरक्षेत्राचे पो.कॉ. उमेश गायकवाड यांना फोन केला. परंतु, ते सुकळी फाट्यावर पेट्रोलिंग करीत होते. ते पहाटे चारच्या दरम्यान वस्तीवर पोहचले. तसेच बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे हेेही चारच्या दरम्यान वस्तीवर पोहचले. तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. दरम्यान, या घटनेचा तपास लावून चोरट्यांना जेरबंद करा. अन्यथा, बोधेगाव पोलिस दूरक्षेत्रासमोर उपोषणास बसण्याचा इशारा शंकर गमे यांनी दिला आहे.

Back to top button