पाथर्डी : भारनियमन बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या | पुढारी

पाथर्डी : भारनियमन बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा ठिय्या

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : थ्री फेज लाईटनंतर येणार्‍या सिंगलफेज लाईटमधील भारनियमन बंद करा, या मागणीसाठी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे ग्रामपंचायत सदस्य अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली शिरसाटवाडी येथील गणपती मंदिरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी पालवे म्हणाले की, एसडीटी फीडरमधून थ्री फेज बंद झाल्यावर सिंगल फेज लाईट दिली जाते. परंतु, महावितरणकडून सकाळी 3 तास व रात्री 3 तास भारनियमन केले जात आहे.

या फीडरवर प्रामुख्याने मोहोटा, मोहरी, शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी, माणिकदौंडी, पिरेवाडी, जाटदेवळे, बोरसेवाडी, चितळवाडी, कोठेवाडी, लांडकवाडी, आल्हनवाडी, घुमटवाडी, पत्राचा तांडा, धनगरवाडी या डोंगराळ भागातील गावांचा समावेश आहे. या गावांत सध्या बिबट्याचा वावर आहे. विजेअभावी रात्री अंधार असल्याने भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे हे भारनियमन त्वरित बंद करण्याची मागणी त्यांनी केली.

महावितरणचे उपकार्यकारी अभियंता सचिन माळी, सहाय्यक अभियंता मयूर जाधव यांनी येत्या दोन दिवसांत शनिवारपासून होणारे भारनियमन बंद करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. आंदोलनात मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, अशोक आंधळे, सुनील पवार, अंकुश आठरे, पप्पू सानप, संदीप शिरसाट, संजय घुले, राहुल घुले आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या.

Back to top button