पाथर्डी : सोनसाखळी चोरणार्‍यास पाथर्डी शहरामध्ये अटक | पुढारी

पाथर्डी : सोनसाखळी चोरणार्‍यास पाथर्डी शहरामध्ये अटक

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन बाबुराव भोंजिबा नागरगोजे (वय 61, रा. चिंचपूर इजदे) यांच्या गळ्यातील सोन्याची दीड तोळ्याची साखळी चोरी केल्याप्रकरणी बाळू नवनाथ मासाळकर (रा.नाथसागर, पाथर्डी) याला पोलिसांनी अटक केली. या गुन्ह्यातील दोन आरोपी पसार असून, पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. नागरगोजे हे दि 21 एप्रिल रोजी चिंचपूर इजदे येथे त्यांच्या घरी जात असताना संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पाथर्डी नवीन स्टॅण्डवर पुणे ते बीड बसमध्ये बसले.

बस कारेगावजवळ आली असता नागरगोजे यांना गळ्यातील चेन चोरी गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज तपासले असता त्यांना बाळू नवनाथ मासाळकर, सागर पवार (रा.नाथनगर, पाथर्डी), सुनील दत्तू मासाळकर (रा. माणिकदौंडी रोड, पाथर्डी) हे तिघेे संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळून आले. पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक संदीप कानडे, ज्ञानेश्वर रसाळ, भगवान सानप, नारायण कुटे, कृष्णा बडे,आप्पा वैद्य यांच्या पथकाला या गुन्ह्यातील संशयित आरोपी बाळू मासाळकर हा पाथर्डी शहरातील श्री आनंद महाविद्यालय परिसरात असल्याची माहिती मिळाली.

त्याला ताब्यात घेण्यासाठी पथक गेले असता मासाळकर तेथून पळाला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. इतर दोन आरोपींचा शोध सुरू आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सोन साखळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास सुरू होता. जनतेचेही याकडे लक्ष लागलेले होते.

Back to top button