टाकळीभान : अनधिकृत नळधारकांवर कारवाई करण्याची मागणी

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा : टाकळीभान ग्रामपंचायतच्या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनमधून घेतलेल्या अनधिकृत नळकनेक्शन धारकावर कारवाई करावी, अशी मागणी गणेश रमेश नागले यांनी निवेदनाद्वारे केली आहे. सरपंच, ग्रामविकास अधिकारी टाकळीभान ग्रामपंचायत यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मी टाकळीभान येथील प्रभाग क्रमांक 3 मध्ये वास्तव्यास असून मला मिळालेल्या माहितीनुसार टाकळीभान ग्रामपंचायतची घुमनदेव रोडलगतच्या वस्तींना पाणीपुरवठा करण्यासाठी पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकलेली असून या पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन मधून काही जणांनी चोरून नळ कनेक्शन घेतलेले आहे.
संबंधितांनी नळ कनेक्शन घेण्याकामी टाकळीभान ग्रामपंचायतची पूर्व परवानगी घेतलेली नसून अनधिकृत नळ कनेक्शन घेतले आहे. याबाबत टाकळीभान ग्रामपंचायतने नळ कनेक्शन अधिकृत करून घ्यावे व थकीत पाणीपट्टी भरावी, अशी नोटीस संबंधितांना बजावली आहे, तरीही संबंधितांनी आजपावेतो अनधिकृत नळ कनेक्शन अधिकृत केलेले नाही. त्यामुळे संबंधितांवर पाणीचोरीचा गुन्हा 16 ऑगस्टपर्यंत दाखल करावा, अन्यथा दि. 17 ऑगस्ट रोजी कुठलीही पूर्व कल्पना न देता टाकळीमान ग्रामपंचायत समोर उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागले यांनी दिला आहे.
…………………………………………………………..