पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा | पुढारी

पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : दुसर्‍यांदा गरोदर असलेल्या पत्नीला गर्भपात करण्यास सांगितले असता तिने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या पतीने पत्नीचा उशीने गळा आवळून, विजेचा शॉक देऊन निर्घृण खून केला. याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने पत्नीचा खून करणार्‍या पतीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, राहाता तालुक्या तील पाथरे बुद्रुक येथील भाऊसाहेब संभाजी कदम यांची मुलगी वर्षा बाळासाहेब पिलगर (वय 27, रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) ही दुसर्‍यांदा गरोदर राहिली होती. मात्र, पती बाळासाहेब भिकाजी पिलगर, सासू लिलाबाई भिकाजी पिलगर, दीर सुरेश भिकाजी पिलगर यांनी वर्षा हिने गर्भपात करावा, यासाठी वेळोवेळी दबाव आणला. परंतु, तिने गर्भपातास विरोध केल्याचा राग मनात धरून पती बाळासाहेब, दीर सुरेश व सासू लिलाबाई यांनी राहत्या घरात वर्षा हिचे उशीने तोंड दाबून व बोटाला वायर जोडून विजेचा शॉक दिला.

या कृत्याने वर्षा हिचा मृत्यू झाला. याप्रकरणी आश्वी पोलिस ठाण्यात पतीसह दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करून सपोनि योगेश कामाले यांनी न्यायालयात चार्जशीट दाखल केले होते. याप्रकरणी 12 साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा न्यायाधीश वाय. पी. मनाठकर यांनी सर्व साक्षी पुराव्याची खात्री करून, पती दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Back to top button