पारनेर : पाच हजार डॉक्टरांचे भवितव्य टांगणीला | पुढारी

पारनेर : पाच हजार डॉक्टरांचे भवितव्य टांगणीला

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : वैद्यकीय आंतरवासीयता प्रशिक्षण पात्रतेअभावी 5 हजार डॉक्टरांचे भवितव्य टांगणीला लागले असून यासाठी तीन ते चार महिन्यांनी मुदत वाढवावी, अशी मागणी राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरेंच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाकडून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन करण्यात आली, तसेच आमदार नीलेश लंके यांच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांनी राज्याचे राज्यपाल महामहिम भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील सुमारे 5 हजारांहून अधिक डॉक्टरांपुढे असलेल्या समस्येबाबत आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली भेट घेऊन चर्चा केली. यावेळी विद्यार्थी चळवळीतील प्रवीण औटी, डॉ. भूषण पवार डॉ. राहुल भाईक, डॉ.श्याम पाटील, डॉ.ऋषिकेश चव्हाण, डॉ. सौरभ बनसोडे उपस्थित होते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑल इंडिया आयुष पोस्ट ग्रॅज्युएशन एन्ट्रान्स टेस्टबाबत राष्ट्रीय परीक्षा एजन्सीकडून पब्लिक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली. परंतु 2016-17 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला विलंब झाले, तसेच कोविड संकटामुळे परीक्षांना झालेल्या विलंबामुळे संबंधित शैक्षणिक वर्षातील डॉक्टरांचे आंतरवासीयता प्रशिक्षण जवळपास एक वर्षाने पुढे ढकलले गेले.

राष्ट्रीय परीक्षेसाठी 31 ऑक्टोबर 2022 या तारखेपूर्वी आंतरवासीयता प्रशिक्षण पूर्ण व्हावे, ही अट देण्यात आली. परंतु यामुळे महाराष्ट्रातील एकही फ्रेशर डॉक्टर याकरिता पात्र होत नाही. यात लक्ष घालून पात्रतेची तारीख तीन ते चार महिन्यांनी पुढे ढकलणेकरिता प्रयत्न करून पाच हजारांहून अधिक आयुष डॉक्टरांची समस्या सोडवावी, ही विनंती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व विरोधी पक्षनेते अजित पवार यांना या भेटीदरम्यान करण्यात आली आहे.

Back to top button