नगर : जिल्हा परिषदेचे पुन्हा 75 गट? | पुढारी

नगर : जिल्हा परिषदेचे पुन्हा 75 गट?

नगर : पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयानंतर नगर जिल्हा परिषदेच्या 85 गटांसाठी पडलेल्या आरक्षणाचा गोंधळ सुरू असतानाच शिंदे-फडणवीस सरकारने नव्याने घेतलेल्या निर्णयाने पुन्हा 75 गट होणार आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या या नव्या निर्णयाने पूर्वीची गट रचना, आरक्षण संपुष्टात येवून नव्याने केले जाईल. या प्रक्रियेला विलंब होणार असल्याने निवडणूकही लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत कमीत कमी 50, तर जास्तीत जास्त 75 जिल्हा परिषद सदस्य संख्या निश्चितीचा निर्णय घेण्यात आला.

तसा अध्यादेश निघणार आहे. या निर्णयामुळे नगर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या पुन्हा 75 होणार आहे. जिल्हा प्रशासनाने गटाची तोडफोड करत 75 चे 85 गट निर्माण केले होते. आता पुन्हा एकदा गटाची फेररचना होणार असल्याचे अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. नगर जिल्हा परिषदेची 2017 सालची निवडणूक 73 गटांमध्ये झाली होती. या पंचवार्षिक बॉडीची मुदत 20 मार्च 2022 रोजी संपुष्टात आली. महाविकास आघाडी सरकारने राज्यातील गट आणि गणांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार नगर जिल्हा परिषद सदस्यांच्या 73 संख्येत बाराची भर पडून 85 गट झाले. पंचायत समितीचे गणही वाढून 170 झाले.

या गटांच्या रचनेबाबत दोन वेळा अध्यादेश निघाले. त्यानंतर कुठे कच्ची आणि त्यानंतर अंतिम रचना झाली. जूनमध्ये ही रचना प्रसिद्ध झाली. 13 जुुलैला 85 गट आणि 170 गणांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम ठरला असतानाच 12 तारखेलाच सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी सुनावणी दरम्यान या सोडतीला स्थगिती देण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा सुनावणी होऊन ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पाठोपाठ गट-गण सोडतीचाही पुन्हा कार्यक्रम ठरला.

28 जुलैला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी नगर जिल्हा परिषदेच्या 85 गटांची आरक्षण सोडत नगरला, तर 170 गणांची सोडत त्या त्या तहसील कार्यालयात काढण्यात आली. 85 गटांमध्ये ओबीसींच्या जागेत दोनने भर पडली. 22 गटांत ओबीसी आरक्षण काढले, अनुसूचित जातीचे 11 आणि जमातीचे 8 गटांत आरक्षण निघाले. सर्वसाधारण 44 गट खुले झाले. या सर्व प्रवर्गात 43 गटांत महिलांना जिल्हा परिषदेचे दरवाजे खुले झाले.

आता निवडणूक जाहीर होईल या शक्यतेवर इच्छुकांची गटात संपर्क वाढवित मतदारांच्या गाठीभेटी सुरू केल्या. निवडणुकीचे वारे सुरू असतानाचा शिंदे-फडणवीस सरकारने जिल्हा परिषदेत कमीत कमी 50, तर जास्तीत जास्त 75 सदस्य संख्या असेल, असा निर्णय घेतला. या नव्या निर्णयामुळे नगर जिल्हा परिषदेत वाढलेले 12 गट आणि 24 गणही कमी होऊन आता पुन्हा 75 गट होणार आहे. 85 गट करताना प्रशासनाने मूळ गटांची केलेली तोडफोड आणि वादग्रस्त आरक्षणही आता रद्द होणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 75 गटात व 150 गणाची फेररचना होईल, त्यानंतर आरक्षण काढले जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. या नव्या बदलाची प्रक्रियेला मोठा अवधी लागणार असल्याने जिल्हा परिषदेची निवडणूक लांबणीवर पडण्याचे संकेत आहेत.

गट आणि आरक्षणही बदलणार!
कॅबिनेटच्या बैठकीनुसार नव्याने अध्यादेश निघेल. त्यात नगर जिल्हा परिषदेच्या 85 गटाचे पुन्हा 75 होतील. पर्यायाने सदस्य संख्या घटेल, तसेच नव्याने आरक्षणही निघेल. सदस्यांची संख्या घटल्याने आरक्षणातही बदल होणार आहे. नव्या बदलानुसार ओबीसींना पुन्हा 20, अनुसूचित जातीला 9 आणि जमातीला 7 गट राखीव असणार आहेत. खुल्यावर्गाला 37 जागा असतील.75 पैकी 50 टक्के प्रमाणे 37 जागा महिलांसाठी राखीव असतील.

Back to top button