राहुरी पोलिसांकडून कोट्यावधींचा बंदी असलेला ड्रग्ससदृष्य औषध साठा जप्त | पुढारी

राहुरी पोलिसांकडून कोट्यावधींचा बंदी असलेला ड्रग्ससदृष्य औषध साठा जप्त

राहुरी, पुढारी वृत्तसेवा: राहुरी पोलिसांनी शहरात छापा टाकत अंमली पदार्थांसह प्रतिबंध केलेले नशा आणणारे औषधे, गर्भ नष्ट करणारे औषधे आणि उत्तेजित करणाऱ्या ड्रग्ससदृष्य पदार्थांसह कोट्यवधी रूपयांचा साठा जप्त करण्यात आला. राहुरी ते बारागाव नांदूर रस्त्यावरील शिव चिदंबरम मंगल कार्यालयालगत असलेल्या गाळ्यांमध्ये प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा लपविण्यात आला होता. छुप्या मार्गाने या औषधांची विक्री करणारे पोलिसांच्या रडारवर आले असून अनेक छोटे मोठे गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकणार असल्याची माहिती पोलिस सुत्रांकडून मिळत आहे.

राहुरी पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त खबर्‍याकडून प्रतिबंधित औषधांसह नशेचे अंमली पदार्थ विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक दराडे यांनी पो.स.ई. सज्जन नर्‍हेडा, महिला पो.स.ई. ज्योती डोके, पोलिस हवालदार अजिनाथ पाखरे, अशोक शिंदे, विकास साळवे, नदीम शेख, प्रविण अहिरे, दादासाहेब रोहोकले, नितीन शिरसाठ, राजेंद्र आरोळे यांनी सापळा लावून तीन जणांना ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच ताब्यात घेतले.

पोलिसांनी खाक्या दाखविताच ड्रग्ससदृष्य साठ्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. त्यानुसार राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर रस्त्यावर असलेल्या शिव चिदंबरम मंगल कार्यालय लगत असलेल्या एका पत्र्याच्या गोडाऊनमध्ये छापेमारी केली. गोडाऊनमध्ये गर्भ नष्ट करणाऱ्या औषधांसह उत्तेजनाचे पदार्थ, गुंगीचे औषधे आणि नशा आणणारे विविध औषधांचा मोठा साठा दिसून आला. जवळपास एक कोटीपेक्षा जास्त रूपयांचा साठा सापडल्याची माहिती पसरताच नांदूर रत्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाचे पोलिस निरीक्षक डी.एम. दरंदले यांना पाचारण केले. श्रीरामपूर विभागाचे पोलिस उप अधिक्षक संदिप मिटके यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देत तपासाला गती दिली.

पोलिसांना गर्भ निरोधक गोळ्या, गर्भ नष्ट करणारे औषधे, कोडीम कफ सिरप, अल्फा झिरम, व्हायग्रा गोळ्यांची आणि रूपयांची मोजमाप प्रक्रिया दुपारीच सुरू झाली. सायंकाळी उशिरापर्यंत पोलिस प्रशाससनासह अन्न आणि औषध प्रशासनाकडून औषधांची पडताळणी व मोजणी सुरू होती. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी माहिती देताना सांगितले की, डॉक्टरांच्या चिठ्ठी शिवाय अवैधरित्या प्रतिबंधित औषधांचा बहुतेक साठा पोलिसांनी जप्त केलेला आहे. याबाबत सविस्तर चौकशी करून गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे सांगितले.

श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधिक्षक स्वाती भोर यांनीही घटनास्थळी भेट देत माहिती घेतली. पोलिसांच्या कामगिरीमुळे केवळ राहुरीतच नव्हे तर जिल्ह्यातील विविध भागामध्ये अवैध आणि प्रतिबंधित असलेले औषध विक्री व साठा उपलब्ध करणार्‍यांचा पर्दाफाश होणार असल्याने सर्वसामान्यांमधून कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.

Back to top button