नगर : पोस्ट कार्यालयाला लागले टाळे | पुढारी

नगर : पोस्ट कार्यालयाला लागले टाळे

जवळा, पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यातील जवळा येथील डाक कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे दैनंदिन कार्यालयीन कामासाठी ग्राहकांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत पोस्टाच्या वरिष्ठ कार्यालयाला अनेक वेळा कळवूनही संबंधित विभाग दखल घेत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जवळा व गाव परिसरातील सुमारे दहा ते पंधरा हजार लोकसंख्या असलेल्या क्षेत्रात हे डाक कार्यालय चालू होते. त्यामुळे तेथे अनेक लोकांच्या विविध कागदपत्रांची देवाण-घेवाण, दैनंदिन आर्थिक व्यवहार, तसेच इतर कामे होत असत. परंतु, गेल्या तीन महिन्यांपासून एक कर्मचारी कार्यालयाला टाळे लावून गेला, तो पुन्हा आलाच नाही. त्यामुळे ते कायमचे बंद असल्याने नागरिक, विद्यार्थी व ग्राहकांची मोठी गैरसोय होऊ लागली आहे.

अनेक सर्वसामान्य लोकांनी तेथे बचत खाते चालू केलेली आहेत. त्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. ऑनलाईन बँकिंगच्या अडचणी वाढल्या आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी लक्ष घालून हे कार्यालय सुरू करावे, अशी मागणी जवळा ग्रामस्थ व ग्राहकांमधून होत आहे. अन्यथा कार्यालयासमोर ढोल बजाओ आंदोलन करण्याचा इशारा भाजप कार्यकर्ते शेखर सोमवंशी, माऊली पठारे, राजेंद्र सालके, जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष सालके, असीम शेख, मुनीर शेख यांनी दिला आहे.

Back to top button