नगर : ‘शिवदुर्ग’च्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेस प्रतिसाद | पुढारी

नगर : ‘शिवदुर्ग’च्या पन्हाळा-पावनखिंड मोहिमेस प्रतिसाद

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक वारसा जतन, गडकिल्ले संवर्धन आणि प्लॅस्टिकमुक्त गडकिल्ले अभियान राबविणारी संस्था म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेने नावलौकिक मिळविला आहे. गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी अनेक तरुण मावळे सहभागी होत आहेत, असे शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले.

या संस्थेच्या वतीने पन्हाळा-पावनखिंड या खडतर मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. हील रायडर्स अडव्हेंचर्स फाऊंडेशन कोल्हापूर यांनी या वर्षी आयोजित केलेल्या चौथ्या मोहिमेत महाराष्ट्रातील 450 मोहीमवीरांनी सहभाग नोंदविला. यामध्ये शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराचे 19 सदस्य सहभागी झाले होते. विशेषतः त्यात तीन महिला रणरागिणीही सहभागी झाल्या होत्या.

राजेश इंगळे, डॉ.चंद्रशेखर कळमकर, विकास आढाव, अक्षय गायकवाड, अभिजीत आढाव, तनिष्का कळमकर, संगीता इंगळे, वैशाली गायकवाड, विजय कुटे, शुभम लोहकरे, संकेत लगड, नवनाथ आढाव,अभिजीत जठार, गणेश कविटकर, गोरख नलगे, निखिल चन्ने, नितीश गायकवाड, नवनाथ खामकर, नवनाथ आढाव या मावळ्यांनी दोन दिवसात 52 किलोमीटर पदभ्रमंती केली.

पन्हाळा ते पावनखिंड शौर्याची गाथा आहे. ऊन-वारा-पाऊस, दर्‍या-खोरे, जंगल-ओढे यामधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या धाडसाची आणि वीर बाजीप्रभू, वीर फुलाजी प्रभू, वीर शिवाजी काशीद यांच्या मुत्सद्दीपणा व पराक्रमाची ही मोहीम आहे. 350 वर्षांपूर्वी घडलेला थरार अनुभवण्यासाठी येथे लढलेल्या प्रत्येक अनामिक मावळ्यांना मानवंदना देण्यासाठी, पन्हाळा ते पावनखिंड मोहीम शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनतर्फे आयोजित केली होती. हील रायडर्स फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या वतीने सहभागी प्रत्येक मोहीमवीरास सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

Back to top button