नगर : मालट्रकखाली चिरडून वृद्धा ठार | पुढारी

नगर : मालट्रकखाली चिरडून वृद्धा ठार

संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : संगमनेरला येत असलेल्या एका वृद्ध दाम्पत्याच्या लुना दुचाकाला वाहनाचा धक्का लागल्याने समोरून येणार्‍या मालट्रकखाली सापडून एका वृद्धेचा मृत्यू झाला. मृत वृद्धेचे पती कारभारी शिंदे (वय 75 वर्षे) हे जखमी झाले. अपघाताची ही दुर्घटना नागपंचमीच्या दिवशी बुधवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नासिक रोडवरील बसस्थानकासमोर घडली. विमल कारभारी शिंदे (वय 70 वर्षे, रा. ओझर खुर्द, ता. संगमनेर) असे या वृद्धेचे नाव आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास कारभारी शिंदे व पत्नी विमल मोपेडवरून संगमनेरच्या दिशेने येत होते. त्याचवेळी बसस्थानक चौकासमोरील बाजूला नवीन नगर रस्त्याकडे वाहनांची ये-जा सुरू असल्याने महामार्गावर नाशिककडून येणारी वाहतूक काही प्रमाणात रोडावली होती. त्यातून मार्ग काढत असताना कारभारी शिंदे यांनीही आपली मोपेड दोन वाहनांच्या मधून काढण्याचा प्रयत्न केला असता यांच्या मोपेडला डाव्या बाजूने आलेल्या वाहनाचा धक्का लागल्याने त्यांचे मोपेडवरील नियंत्रण सुटले आणि ते दोघेही मोपेडसह महामार्गावर पडले. यावेळी आलेल्या मालट्रकच्या चाकाखाली सापडून विमल शिंदे यांचा चिरडून जागीच मृत्यू झाला.

बेकायदेशीर वाहनतळ हटवा..!

गेल्या काही वर्षांपासून बसस्थानक परिसरातील अतिक्रमणांमध्ये मोठी वाढ होण्यासह लाकडाच्या मिलबाहेर श्रीरामपूर येथील खासगी प्रवाशी वाहतूक करणार्‍या काळी-पिवळी जीप चालक कधीच वाहतुकीचे नियम पाळता नाहीत. भररस्त्यात वाहने उभी करून प्रवाशांना आरोळ्या मारणे, दोन-चार प्रवाशी गाडीत बसवून घिरट्या घालतात. त्यामुळे या मार्गावरून पादचारी, वयस्कर, विद्यार्थी व दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून दुचाकी चालवावी लागते. बेकायदा खासगी वाहनतळ हटवा, अशी मागणी होत आहे.

Back to top button