नगर :दोन वर्षांत पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षा! | पुढारी

नगर :दोन वर्षांत पुन्हा गुन्हा केल्यास शिक्षा!

नगर, पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमण काढताना राष्ट्रीय महामार्गाच्या शाखा अभियंत्यास मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी आरोपी दत्तात्रय हरिभाऊ जाधव (35, रा. चिचोंडी पाटील ता.जि. नगर) याची प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी 15 हजार नुकसान भरपाई व दोन वर्षांच्या प्रतिज्ञापत्रावर सुटका केली आहे. मात्र, दोन वर्षांत कोणताही गुन्हा केल्यास, आरोपीला पुन्हा शिक्षा देण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

राष्ट्रीय महामार्गाचे शाखा अभियंता राजेंद्र शिवाजी कुलांगे दि. 23 फेब्रुवारी 2021 रोजी चिचोंडी पाटील येथील बस स्थानकाजवळील अतिक्रमण काढत होते. त्यावेळी आरोपी दत्तात्रय जाधव हा त्यांना उद्देशून म्हणाला की, ही जागा काय तुमच्या बापाची आहे का? तसेच शिवीगाळ करू लागला. शाखा अभियंता कुलांगे आरोपीस म्हणाले की, आम्ही सरकारी काम करीत आहोत, तुम्ही मध्ये येऊ नका. असे म्हटल्याचा राग आल्याने आरोपीने त्यांना लाथाबुक्क्यानी मारहाण केली. तसेच, ‘येथे कसे काय काम करता ते पाहतो’, असे म्हणून शाखा अभियंता कुलांगे यांना जिवे मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत शाखा अभियंता कुलांगे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तपास पोलिस उपनिरीक्षक आर. एन. राऊत यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात सरकार पक्षातर्फे 4 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश जोशी व दिलीप बी. हिवाळे यांनी सहकार्य केले.

Back to top button