नगर : झेडपीच्या स्वच्छता रथ यात्रेतून जनजागृती | पुढारी

नगर : झेडपीच्या स्वच्छता रथ यात्रेतून जनजागृती

नगर, पुढारी वृत्तसेवा : आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत पाणी व स्वच्छता विभाग यांच्या वतीने जिल्ह्यातील गावागावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयक जनजागृती करण्यात येणार असून समाजाला बरोबर घेऊन गाव स्वच्छ, शाश्वत व आरोग्यदायी होण्यासाठी योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन आशिष येरेकर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी स्वच्छता रथाच्या उद्घाटना प्रसंगी केले.

पाणी व स्वच्छता विभाग नेहमी लोकांमध्ये जाणीव जागृती निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळया प्रकारचे उपक्रम राबविण्यात येतात. त्याचाच भाग म्हणून जिल्हयातील सर्वग्रामपंचायतीमध्ये स्वच्छ भारत मिशन, हागणदारीमुक्त अधिक (ओडीएफ प्लस) जल जिवन मिशन शुध्द पाण्याची उपलब्धता, वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता, गावाची स्वच्छता, घर व अन्न पदार्थाचे स्वच्छता, सांडपाण्याची व्यवस्था घनकचर्‍याचे योग्य व्यवस्थापन इत्यादीबाबत स्वच्छता रथाद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.

याप्रसंगी अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, सहायक आयुक्त राधाकिसन देवढे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे, कार्यकारी अभियंता आनंद रुपनर, रेश्मा होजगे, (नरेगा), लेखाधिकारी धनंजय आंधळे, सोमनाथ भिटे आदी उपस्थित होते. यावेळी प्रकल्प संचालक सुरेश शिंदे यांनी उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

Back to top button