नगर : किरकोळ वादातून तरुणावर चाकूहल्ला | पुढारी

नगर : किरकोळ वादातून तरुणावर चाकूहल्ला

श्रीगोंदा, पुढारी वृत्तसेवा : श्रीगोंदा शहरातील कौटिल्य करिअर अकॅडमी येथे दीपक भालेराव या तरुणावर किरकोळ वादातून सूरज गंगावणे व विशाल गंगावणे (रा.गुरव पिंपरी, ता. कर्जत) या दोघांनी चाकूहल्ला करत गंभीर जखमी केले. ही घटना 31 जुलैच्या पहाटे घडली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सूरज गंगावणे यास अटक करण्यात आली आहे.

स्पर्धा परीक्षा केंद्रात पोलिस भरतीची तयारी करण्यासाठी काही मुले शारदा कॉम्प्लेक्समध्ये राहतात. दीपक भालेराव हाही पोलिस भरतीची तयारी करत आहे. 30 जुलै रोजी लायब्ररीत सूरज गंगावणे हा दीपक भालेराव यास मोठ्याने बोलू नको, हळू आवाजात बोल असे म्हणाला. त्याचा राग आल्याने दीपकने सूरजच्या कानाखाली मारली. उपस्थित तरुणांनी त्यांचा वाद मिटवला. मात्र, दीपकने मारहाण केल्याची माहिती सूरजने त्याचा भाऊ विशाल यास दिली.

त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास सूरज व विशाल गंगावणे दीपकच्या खोलीत गेले. तेथे विशाल याने त्याचे हातातील चाकूने दीपकच्या गळ्यावर वार करून त्यास जखमी केले. यामध्ये सूरजच्या हाताला चाकू लागून त्यास जखम झाली आहे.
याप्रकरणी अभिषेक कराळे यांच्या फिर्यादीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सूरज गंगावणे यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक महेश जानकर करत आहेत.

…तर घटना घडली नसती

श्रीगोंदा शहरात पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण देणार्‍या या ठिकाणी अनेक विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालविणार्‍यांपैकी जबाबदार व्यक्ती हजर नसल्याने हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. शहरात पोलिस भरतीसाठी अनेक विद्यार्थी दाखल झालेले आहेत. परजिल्ह्यातून येणार्‍या विद्यार्थी वर्गाची संख्या मोठी आहे. किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात होत असल्याने, पोलिसांनी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

Back to top button