नगर : हंगेश्वराच्या दर्शनास भाविकांची मांदियाळी | पुढारी

नगर : हंगेश्वराच्या दर्शनास भाविकांची मांदियाळी

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील श्री क्षेत्र हंगा येथे श्रावणी सोमवारनिमित्त प्रत्येक सोमवारी यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. या यात्रोत्सवात राज्यभरातून भाविक दर्शनासाठी गर्दीेकरतात. मंदिर समितीकडून यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार नीलेश लंके यांनी दिली.

काल श्रावणातील पहिला सोमवार असल्याने दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विविध भागांतून भाविक दर्शनासाठी येतात. प्रत्येक श्रावणी सोमवारी येथे दर्शनासाठी प्रचंड गर्दी होते दर्शनासाठी दर्शन रांग भाविकांसाठी पिण्याचे पाणी, खिचडीचा प्रसादाची सोय हंगेश्वर देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आली आहे . हंगेश्वर यात्रेचे नियोजन ट्रस्टचे अध्यक्ष आमदार नीलेश लंके यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात आले आहे. हंगा हे त्यांच्या मार्गदर्शनाखाली गावचा विकास, तसेच मंदिराचा विकास व मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे. सर्व भाविकांनी श्री हंगेश्वर देवस्थान यात्रेत सहभाग घेऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टचे सहसचिव चंद्रकांत मोढवे यांनी केले.

हंगा गावाच्या नावावरूनच नदीला हंगा तसेच महादेवाला हंगेश्वर हे नाव प्राप्त झाले आहे. गावात प्रवेश करताना शिवकालीन मोठी वेश स्वागत करते. वेस आजही भक्कम आहे. मागील चार-पाच वर्षांपूर्वी वेशीचा जीर्णोद्धार करण्यात आला. पूर्वी गावाला गावकूस होते, तसेच चोहोबाजूंनी बुरूज व तटबंदी होती. हंगा गाव अतिशय पुरातन असून, मंदिरा भोवताली वस्ती तयार झाली असावी, असा अंदाज आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शीलालेखावर शके 1311 असा उल्लेख आहे.

हंगेश्वराचे मंदिर पूर्वाभिमुख असून, पाचशे बाय तीनशे बाय 15 फूट उंच चौथ्यावर मंदिर बांधले आहे. मंदिराचे काम एका विशिष्ट प्रकारच्या दगडात केले आहे. मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला काही पायर्‍या चढून जावे लागते.
मुख्य प्रवेशद्वारावर मोठी घंटा असून ही घंटा पोर्तुगीज कालीन असावी, असा अंदाज आहे मुख्य प्रवेशद्वारातून आज प्रवेश केल्यावर डाव्या हाताला पुरातन बांधकाम शौलेतील ओवरी आहे, ती आजही सुस्थितीत आहे, त्यानंतर समोर मुख्य मंदिर आहे.

शिलालेख उत्तम स्थितीत

मुख्य मंदिराचे बांधकाम अतिशय सुंदर असून, दगडावर वेगवेगळ्या देवतांची मूर्ती कोरल्या आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर पुरातन काळातील शिलालेख आजही उत्तम स्थितीत आहे या शिलालेखावरून मंदिराच्या बांधकामाची माहिती मिळते. मुख्य मंदिरासमोर असलेल्या छत्रीमध्ये नंदी, गणपती, हनुमान, नागदेवता व इतर देव-देवतांची मूर्ती विराजमान आहेत. मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर पाणी, फुले,सूर्यदेवतांच्या, तसेच दैत्यांचीही मूर्ती कोरल्या आहेत, हे कोरीव काम पाहून त्या काळातील कारागिरांचे कसब लक्षात येते.

मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मोठा सभामंडप आहे. त्यामध्ये मध्यभागी कासव आहे. या मंडपाला एकही खांब नाही व छत घुमटाकार आहे. सभा मंडपासमोर मुख्य गाभारा असून, गाभार्‍यात दगडी स्वयंभू शिवलिंग विराजमान आहे. गाभारा व मंडप हा पूर्ण दगडी बांधकामात आहे. त्यावरील पुढील काम लक्ष वेधणारे आहे. गाभार्‍यात असलेल्या मुख्य शिवलिंगावर अभिषेक होतो, तसेच प्रत्येक श्रावणी सोमवारी त्यावर कोरड्या तांदळाच्या पिंडी तयार होतात. या पिंडींचे दर्शन अतिशय मनोहारी आहे. प्रत्येक पिंडीच्या मधोमध एक लिंबू असते. त्यावर दुसरी पिंड अशा पाच पिंडी तयार होतात, या पिंडींचे दर्शन घेण्यासाठी राज्यातून तसेच राज्याबाहेरूनही भाविक येतात.

Back to top button