नगर : नेवाशात सौभाग्यवतींसाठी इच्छुकांनी लावली फिल्डिंग | पुढारी

नगर : नेवाशात सौभाग्यवतींसाठी इच्छुकांनी लावली फिल्डिंग

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : आरक्षण सोडतीतून इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फिरल्याने आता सौभाग्यवतींसाठी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणी सुरू झाली आहे. उमेदवारीसाठी पतीराजांची श्रेष्ठींकडे फिल्डिंग लावली जात आहे.

आरक्षण सोडतीमध्ये तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटांत सात ठिकाणी महिला आरक्षण, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी सोळा गणांत आठ जागा महिला आरक्षणात राखीव झाल्याने महिलांना 50 टक्के आरक्षण ही मोहीम खर्‍या अर्थाने आरक्षण सोडतीमध्ये यशस्वी झाली आहे. दुसरीकडे गट आणि गणांची मोडतोडीने इच्छुक नेत्यांचे मनसुबे उधळले आहेत. आता सौभाग्यवतींना मैदानात उतरविण्यासाठी गण-गटांची चाचपणी करून राजकीय आखाड्याचा अंदाज घेत आहेत.

तालुक्यात जि. प., पंचायत समितीची निवडणूक लढविण्यासाठी जोषात असलेली नेतेमंडळी आरक्षण जाहीर होताच महिला आरक्षण पाहून आवा्क झाले. सलाबतपूर, सोनई, शिंगणापूर गटामध्ये उमेदवारीसाठी गर्दी होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या चर्चेला उधाण आले आहे. येथील लढती लक्षवेधी ठरणार असल्याचे जाणकार सांगत आहेत.

Back to top button