नगर : श्रीरामपूरच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार | पुढारी

नगर : श्रीरामपूरच्या मुलीवर वेळोवेळी अत्याचार

श्रीरामपूर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील वॉर्ड नं. 2 मधील एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी वेळोवेळी अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, पीडित मुलीला बळजबरीने व्यवसायास लावण्याचा घृणास्पद प्रकार घडला आहे. याप्रकरणी मुल्ला कटर याला अटक करून पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याची कोठडी आज संपत असताना याप्रकरणी बाबा चेंडवालसह एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेवून, न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना 8 दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

याप्रकरणी डीवायएसपी संदीप मिटके यांनी स्वतः पीडित मुलीची सुटका करून, 5 जणांवर पोक्सोसह अन्य गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील वॉर्ड नं. 2 मधील अल्पवयीन मुलीस एका महिलेने गेल्यावर्षी गणेशोत्सव काळात स्वतःच्या घरी नेले. तिला मारहाण करून, आईला जीवे मारण्याची धमकी देवून तिघांनी वेळोवेळी अत्याचार केला. तिच्या इच्छेविरोधात आईच्या रखवालीतून अपहरण केले. पांढरीपूल येथील डोंगर पायथ्याशी व्यवसायात अडकविले. तिला बाबा चेंडवाल याच्या हवाली करून त्याच्याकडून पैसे घेत तिला अक्षरशः विकले. तिच्या इच्छेविरोधात बाबा चेंडवाल याने किळसवाणे वागणूक देवून तिला छळले. मुल्ला कटर, पप्पू गोरे व बाबा चेंडवाल यांनी शेवगाव येथे खोली भाड्याने घेवून, तिच्या इच्छेविरुद्ध वागण्यास भाग पाडले.

दरम्यान, पीडित अल्पवयीन मुलीने याबाबत शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मुल्ला कटरविरुद्ध कारवाई करण्यासाठी शहरात हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला होता. दरम्यान, याप्रकरणी डीवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. संजय सानप पुढील तपास करीत आहे.

Back to top button