नगर : राहुरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी | पुढारी

नगर : राहुरीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : राहुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये अवैध धंद्यांचे साम्राज्य वाढत असतानाच दुसरीकडे टोळी निर्माण करीत दमबाजी, हाणामारीच्या माध्यमातून दहशत निर्माण करणार्‍यांचेही चांगलेच फावले जात असल्याचे दारुण चित्र दिसत आहे. अशाच दोन गटांतील वादामध्ये एकास जबर मारहाण करण्यात आली.

30 जुलै रोजी राहुरी शहरातील दोन तरुणांमध्ये किरकोळ वाद झाले होते. ते वाद मिटवण्यात आले होते, मात्र, दि. 31 जुलै रोजी दुपारी अडीच वाजेदरम्यान शहरातील शुक्लेश्वर चौक येथे दोन गटांत पुन्हा मारहाण झाली. त्या नंतर दोन्ही गटातील शेकडो तरुण राहुरी पोलिस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, काही समंजस लोकांनी मध्यस्थी करून सदर वाद मिटविला. मात्र, रात्री 10 वाजेदरम्यान आजान फिरोज पठाण हा तरुण त्याच्या काही मित्रांसोबत शुक्लेश्वर चौक येथे गप्पा मारत बसला होता. त्यावेळी सात तरुणांची टोळी त्या ठिकाणी आली. दुपारी झालेल्या मारहाणीचा राग मनात धरून त्यांनी आजान पठाण या तरुणाला फायटर, लोखंडी रॉड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक सज्जन नार्‍हेडा पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना पाहून सर्वच जण पसार झाले.

आजान पठाण या तरुणाला गंभीर दुखापत झाली असून, त्याच्यावर अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून स्वप्निल कुसमूडे, ओंकार डहाके, नीलेश शिरसाठ, अमोल शिरसाठ, सैफ शफी शेख, शिवा नागरे, शुभम चांदणे या सात जणांवर मारहाणीचा व जिवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर मारहाण करणारे पसार झाले. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक शिवाजी खरात हे करीत आहेत.

Back to top button