नगर : प्रकल्प अधिकारी लाचेच्या जाळ्यात | पुढारी

नगर : प्रकल्प अधिकारी लाचेच्या जाळ्यात

नेवासा, पुढारी वृत्तसेवा : नेवासा येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान सदाशिव ढाकणे यांना 45 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. त्यांच्याविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा पंचायत समितीच्या बालविकास प्रकल्पाकडे भाडेतत्त्वावर चारचाकी (कार) वाहन लावण्यात आलेले आहे. या वाहनाचे करारानुसार असलेले 1 लाख 14 हजार 261 रुपये भाडे मंजूर करण्यासाठी प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे यांनी तक्रारदाराकडे 50 हजार रूपयांची मागणी केली होती. मात्र, तडजोडीअंती 45 हजार रुपये देण्याचे ठरले. त्यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.

त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून तक्रारीची पंचासमक्ष पडताळणी करण्यात आली. ठरल्यानुसार भाड्यापोटी सदर रकमेचा धनादेश ढाकणे यांनी तक्रारदारास दिला. त्या मोबदल्यात ढाकणे यांनी 45 हजारांची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी (दि.1) सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, गहिनीनाथ गमे, अंमलदार वैभव पांढरे, बाबासाहेब कराड, चालक हरून शेख, राहुल डोळसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button