नगर : पारनेरमध्ये शेतकर्‍यांना मिळेना युरिया..! | पुढारी

नगर : पारनेरमध्ये शेतकर्‍यांना मिळेना युरिया..!

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यात पावसाने उघडदीप दिल्याने शेतीच्या कामांना वेग आला असून, खरिपाची पिके जोमात आहेत. या पिकांना सध्या युरियाची गरज आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांना युरिया सोबत इतर खते व औषधे घेण्याचे बंधन केले जात आहे. हे बंधन कंपनीकडून केले जात असल्याची माहिती कृषी सेवा केंद्र संचालकांकडून दिली जात आहे. त्याामुळे कृषी सेवा केंद्रांसोबतच विविध युरिया उत्पादक कंपन्यांकडून आर्थिक लूट तसेच पिळवणूक होत असल्याने शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पावसामुळे पिकं पिवळी पडायला लागली आहेत. अनेक पिकांवर रोगाचा प्रादूर्भाव झाला आहे. या कालावधीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी युरीयाची वाटाणा, कांदा, मका, बाजरी, तूर आदी पिकांना गरज असते. परंतु अनेक कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध नाही. असलेच तर त्यासोबत इतर वस्तू घ्याव्या लागतात. खताचा तुटवडा असल्याने शेतकर्यांना चिंता सतावत आहे.

पारनेरसह तालुक्यातील भाळवणी, कान्हूर पठार, टाकळी ढोकेश्वर, जवळे, निघोज, विविध कृषी सेवा चालकांकडून युरियाच्या एका गोणी सोबत 19-19-19 बायोला मायक्रोला पीएच आदी खते व औषधे घेण्याची सक्ती केली जाते. मात्र, शेतकर्‍याला फक्त युरिया गरजेचा असून, या वस्तू कंपनीकडून शेतकर्‍याच्या माथी मारण्यात येत आहेत.या वस्तू घेतल्या नाही, तर युरियाची गोणी मिळत नाही. तसेच कृषी सेवा केंद्रांना देखील कंपनीच्या वितरणकाकडून गोणीसोबत खते औषधे घेण्याचे बंधनकारक केले आहे. त्याखेरीस त्यांना युरिया दिला जात नाही. त्यामुळे कृषी सेवा चालकांचा नाईलाज झाला आहे.

अनेक कृषी सेवा केंद्र संचालक यामुळे दुकानात युरिया विक्रीला ठेवत नाहीत. युरिया न ठेवल्यामुळे शेतकर्‍यांना पिकांना देण्यासाठी युरिया मिळणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे काही भागात युरियाचा तुटवडा कंपनीच्या गलथानपणामुळे झाला असल्याचे दिसून येत आहे. याबाबत तालुक्यातील शेतकर्‍यांनी नाराजी व्यक्त केलीं आहे. पिकांना योग्य वाढीसाठी युरिया खताची नितांत गरज असते. परंतू सध्या युरिया खत उपलब्ध नसल्याने शेतकर्यांची पंचाईत होत आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकर्यांची कसरत सुरू आहे. पिकांना देण्याकरिता युरियाच बाजारात उपलब्ध नसल्याने शेतकर्र्‍यांनी कोणती खते पिकांना द्यावी, असा प्रश्न शेतकर्‍यांमधून विचारला जात आहे.

युरियाचा होतोय काळाबाजार

अनेक ठिकाणी युरिया घेण्यासाठी शेतकर्‍यांना युरियासोबत इतर खतं घेण्याची सक्ती देखील केली जाते. त्यामुळे शेतकर्‍यांची मोठ्या प्रमाणात लूट होत आहे. जर फक्त युरियाच घ्यायचा असेल, तर मात्र, शेतकर्‍यांना मूळ किंमतीपेक्षा दोन पैसे जास्त द्यावे लागत आहेत. एकंदरीत युरियाचा काळा बाजारही सुरू झाला आहे. कृषी विभाग युरियाचा काळाबाजार नसल्याचा दावा करीत असला तरी बाजारपेठेत शेतकर्यांची आर्थिक लूट होत आहे. शासनाने याकडे लक्ष द्यावे व शेतकर्‍यांना मुबलक प्रमाणात युरिया उपलब्ध करावा, अशी मागणी होत आहे.

युरियाची वाढती मागणी लक्षात घेता, बफर स्टॉक खुला करण्यात आला आहे. त्यामुळे तुटवडा जाणवणार नाही. युरियासोबत कोणतेही खत औषध घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी झाल्या नाहीत. युरिया सोबत कोणतेही खत औषध देणे बंधनकारक नसून असा प्रकार कुठे आढळून येत असल्यास संबंधित कृषी सेवा केंद्र चालक तसेच शेतकर्‍यांनी लेखी तक्रार द्यावी, संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

                                                         – शंकर किरवे, जिल्हा कृषी विकास अधिकारी

Back to top button