नगर : शेवगाव-पाथर्डीच्या तीन नारी सर्वांना भारी! | पुढारी

नगर : शेवगाव-पाथर्डीच्या तीन नारी सर्वांना भारी!

शेवगाव, रमेश चौधरी : शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात आमदार मोनिका राजळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले व माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे या तिन्ही सुसंस्कृत महिलांची नारीशक्ती सर्वांना भारी, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. दोन्ही तालुक्यात मातब्बर असलेल्या राजळे, घुले, ढाकणे घराण्यांच्या पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व त्या करतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था व इतर सर्व निवडणुकांमध्ये उच्चशिक्षित आणि राजकारणाची घरदांज सुसंस्कृत पातळी सांभाळून असलेल्या या तिन्ही महिलांभोवतीच राजकारण फिरणार आहे.

शासनाने महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्यानंतर खर्‍या अर्थाने महिलांना राजकारणात संधी मिळण्यास सुरवात झाली. ग्रामपंचायतीपासून ते विधानसभेपर्यंत महिलाराज सुरू झाले. त्यांच्या हाती सत्ता असताना आश्वासने, गटबाजी यांना काही प्रमाणात ब्रेक लागला. विकासाच्या बाबतीत सुधारणा होत गेल्या. परंतु कार्यकर्त्यांना काही बंधने आली. त्यांचे राजकारण समानता असणारे आहे. अशाच प्रकारे शेवगाव-पाथर्डीच्या राजकारणात आमदार मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माजी राजश्री घुले, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे या तीन नारी राजकारणात जरी उशिराने आल्या असल्या तरी त्या सर्वांना भारी पडताना दिसत आहेत.

राजकीय वारशाचा प्रभावी वापर

आमदार मोनिका राजळे यांना स्व. दादापाटील राजळे, माजी आमदार आप्पासाहेब राजळे, वडील माजी मंत्री अशोकराव डोणगावकर, स्व. राजीव राजळे यांचा राजकीय वारसा आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्षा, जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक, वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या संचालक अशी पदे भूषवित असतानाच त्या थेट आमदार झाल्या. तर, लोकनेते स्व.मारुतराव घुले, माजी आमदार डॉ.नरेंद्र घुले व चंद्रशेखर घुले यांचा राजकीय वारसा असणार्‍या राजश्री घुले या अडीच वर्षे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा आणि नंतर अडीच वर्षे अध्यक्षा होत्या. माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे, तसेच केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन अ‍ॅड.प्रतापराव ढाकणे यांचा राजकीय वारसा असलेल्या प्रभावती ढाकणे यांची थेट जिल्हा परिषद राजकारणात यशस्वी एन्ट्री झाली.

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राजश्री घुले व प्रभावती ढाकणे यांच्याकडे जिल्हा परिषद पदाधिकारी म्हणून पाहिले जात आहे. शेवगाव -पाथर्डी तालुक्यातील या तीनही महिलांचा राजकीय आलेख वाढता आहे. राजकारणापेक्षा समाजकारण हा हेतू असल्याने भल्याभल्यांना गारद करण्याची क्षमता त्यांच्यात निर्माण झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या बाबतीत लोकमत तयार झाल्यामुळे त्यांच्याकडे हक्काचे मतदान आहे. त्याचबरोबर राजकारणात इतरानांही मोठे करण्याचा त्यांचा वारसा असल्याचा इतिहास आहे. अर्थात तालुक्याचे प्रतिनिधित्व व अनेक संस्थांवर असणारे वर्चस्व याचाही राजकारणात मोठा हातभार असतो, हे तेवढेच सत्य आहे.

एकमेकींवर वैयक्तिक टीका नाही

एकमेकांवर टीका करणे हा राजकारणाचा भाग आहे. मात्र, शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील मोनिका राजळे, राजश्री घुले व प्रभावती ढाकणे या तीनही महिलांनी एकमेकांवर टीका करताना पातळी सांभाळलेली आहे. कुणीही एकमेकींच्या विरोधात खालच्या पातळीवर अथवा वैयक्तिक टीका करीत नाहीत. किंबहुना व्यासपीठावर बोलताना त्यांनी स्वत:वर ताबा ठेवल्याचाच इतिहास आहे.

‘त्यांचे’ गटातटाचे राजकारण नाही

महिला राजकारणात अगदी सावधागिरी बाळगणार्‍या आहेत. राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, याची उकल त्यांना कधीच झाली असावी. त्यामुळे त्यांच्याकडून फक्त विकासाबाबतच आरोप केले गेले. त्यांच्याकडून एकमेकांच्या विकासात अडथळा आणण्याचा कधी प्रयत्न होत नाही. शक्यतो दुसर्‍याचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न झाला नाही. राजकारण करताना कार्यकर्त्यांचा मानपान सांभाळत तिटकारा केला नाही अथवा गटातटाचे राजकारण त्या करीत नाहीत. कुणाचा वैयक्तिक द्वेषही केला जात नाही.

Back to top button