नगर : एसटी बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे हालच हाल! | पुढारी

नगर : एसटी बस बंदमुळे विद्यार्थ्यांचे हालच हाल!

सिद्धटेक, पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असणारे दुधोडी गावातील 20 वर्षांपासून मुक्कामी राशीन – कर्जतमार्गे अहमदनगरला जाणारी एसटी बस सेवा एक वर्षांपासून बंद असल्याने विद्यार्थी व नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.

कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे ऑनलाईन असणार्‍या शाळा ऑफलाईन सुरू झाल्या. यानंतर शाळा सुरू होऊन महिना होताच विद्यार्थ्यांना दिवाळीच्या सुट्या लागल्या. सुट्यानंतर शाळा पूर्ववत सुरू झाल्या. मात्र, जेमतेम महिना होत नाही, तर एसटी महामंडळ कर्मचार्‍यांनी शासन सेवेत विलीनीकरण करावे, या मागणीसाठी संप पुकारला. यामुळे बसने ये-जा करणार्‍या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले.

आता, पूर्ण वेळ शाळा सुरू होऊन महिना उलटला, तरी बरेचसे ग्रामीण परिसरातील विद्यार्थी अजूनही घरीच आहेत. एसटीअभावी अनेकांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. प्राथमिक शिक्षण देण्यासाठी गावागावात शाळा आहेत. मात्र, माध्यमिक व उच्च माध्यमिक, पदवीचे शिक्षण घेण्यासाठी अनेक गावांमधील विद्यार्थ्यांना आपल्या गावापासून 20 ते 25 किलोमीटर परिसरातील मोठ्या गावात किंवा शहरात जावे लागते. यासाठी विद्यार्थी सुरक्षित व वेळेवर पोहोचण्यासाठी शासनाच्या एसटी बस सेवेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अनेक विद्यार्थ्यांचे जेवणाचे डबेही एसटीनेच जातात.

तालुक्यातील सर्व शाळा सुरू आहेत. मात्र, एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने चालू नाही. त्यातच काही ग्रामीण परिसरातून जाणार्‍या बस अजूनही बंद आहेत. त्यामुळे दररोज भाडे खर्च करून जाणे परवडणारे नसल्याने पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवत नसल्याचे चित्र ग्रामीण परिसरामध्ये आहे.

ग्रामीण विद्यार्थिनींची मोठी गैरसोय

दुधोडी – कर्जत – अहमदनगर एसटी बस सेवा बंद असल्याने सर्वाधिक नुकसान शिक्षण घेणार्‍या ग्रामीण परिसरातील विद्यार्थिनींचे होत आहे. मुले मिळेल त्या वाहनाने प्रवास करून शाळेत पोहचतात; मात्र मुलींना अनेक मर्यादा येत असल्याने आणि पालकही धजत असल्याने त्यांचे नुकसान होत आहे. अशा बर्‍याच ठिकाणी बस नसल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अडचणीचे ठरते आहे. काही ठिकाणी खासगी गाड्यांमधून अतिरिक्त पैसे देऊन विद्यार्थ्यांना शाळेत पाठविले जात आहेत.

दुधोडी – नगर मुक्कामी एसटी बस सेवा गेल्या 20 वर्षे चालू आहे; परंतु कोरोना काळात ही सेवा बंद झाली होती, ती सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतीतर्फे दोन वेळेस श्रीगोंदा आगार प्रमुखास पत्र दिले; तरी याची दखल घेऊन बससेवा तातडीने सुरू करावी.

                                                                              -लता जांभळे, सरपंच, दुधोडी.

भांबोरा परिसरातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी कर्जत व नगर येथे प्रवेश घेतला आहे; परंतु दुधोडी – नगर बस बंद असल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

                                                     – नितीन पाटील, अध्यक्ष, सेवा सोसायटी, भांबोरा.

बस सेवेचा दुधोडी, भांबोरा, अंबालिका कारखाना, बारडगाव, येसवडी, राशीन व अन्य गावातील नागरिक व विद्यार्थीना मोठा फायदा होतो. ही बससेवा तातडीने सुरू करावी नाही, तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे आंदोलन केले जाईल.

                                                – गणेश सुद्रिक, कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस.

Back to top button