नगर : जेऊर गट : बालेकिल्ल्यातील लढतीकडे लक्ष | पुढारी

नगर : जेऊर गट : बालेकिल्ल्यातील लढतीकडे लक्ष

नगर तालुका, शशिकांत पवार : नगर तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद गटातील निवडणूक नेहमीच तालुक्यात चर्चेचा विषय राहिलेली आहे. जेऊर जिल्हा परिषद गट माजी मंत्री शिवाजी कर्डिलेंचा बालेकिल्ला समजला जातो. एव्हढेच नाही, तर ‘माझा राजकीय ऊदय जेऊर गावातून झाल्याचे माजी मंत्री कर्डिले वारंवार उघडपणे सांगत असतात’; परंतु गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत जेऊर जिल्हा परिषद गटातून भाग्यश्री मोकाटे यांनी विजय मिळवत कर्डिले यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडले होते.

गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असून, आजची गटातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. काही कार्येकर्ते माजी मंत्री कर्डिलेंना सोडून विरोधी गटात आले, तर मतदार संघातील आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून गटात केलेली कामे, तसेच माजी मंत्री कर्डिलेंचा विधानसभेत झालेल्या पराभवानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या प्रथमच निवडणूका होत आहेत.

कर्डिलेंचे वर्चस्व कायम

जेऊर गटातील झालेल्या ग्रामपंचायत, सोसायटी निवडणुकीत कर्डिले यांचेच प्राबल्य असल्याचे दिसून आले. या गटातील सुमारे 90 टक्के ग्रामपंचायत व सोसायटीमध्ये कर्डिलेंचीच सत्ता आहे; परंतु मतदारांनी दाखवलेला हा विश्वास जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी कायम राहणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या पराभवानंतर, आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी आमदार झाल्यानंतर पहिलीच निवडणूक आहे. आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मिळालेल्या मंत्रीपदाच्या माध्यमातून जेऊर गटातील विकासकामे व नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला आहे. त्यामुळे गटात त्यांचे कार्यकर्ते व वैयक्तिक जनसंपर्क चांगला झालेला आहे.

प्रत्येक वेळी सोयीनुसार मतदान

जेऊर जिल्हा परिषद गटातील मतदार प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका पार पाडताना दिसून येतात. आजपर्यंत झालेल्या निवडणुकीतून समोर आलेले आहे. विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत मतदारांनी पक्षनिष्ठा न पाहता आपल्या सोयीनुसार मतदान केल्याचे आजपर्यंतचा अनुभव आहे. येथील मतदार प्रत्येक निवडणुकीत वेगळी भूमिका पार पाडत असतो हे प्रकर्षाने दिसून आले आहे. त्यामुळे येथील निवडणुकीचा अंदाज वर्तवण्यात अनेक राजकीय अभ्यासकही अपयशी ठरत आहेत.

शिवसेनेचे गाडेंची भूमिका महत्त्वाची

जेऊर गटात शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहणार आहे. तर, माजी मंत्री कर्डिले यांनी विधानसभेत झालेला पराभव विसरत जनतेशी असलेली नाळ तुटू दिली नाही. सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा त्यांचा नित्यक्रम सुरूच आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याने कर्डिले यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांची मोठी फळी तालुक्याप्रमाणे जेऊर गटातही आहे. त्याचमुळे ग्रामपंचायत व सोसायटी निवडणुकीत कर्डिले यांचेच प्राबल्य दिसून आले. एकंदरीत जेऊर गटातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक चांगलीच गाजणार असल्याचे चित्र गटात दिसून येत आहे.

जेऊर गटात महिलाराज

जेऊर गट व गणात तीन्ही जागा महिलांसाठी राखीव झालेल्या आहेत. जिल्हा परिषद गटासाठी सर्वसाधारण महिला तर जेऊर गण अनुसूचित जाती महिला तर शेंडी गण नागरिकांचा मागासप्रवर्ग महिलेसाठी आरक्षित झालेले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

Back to top button