वाळकीत राजकीय हालचालींना वेग | पुढारी

वाळकीत राजकीय हालचालींना वेग

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यातील राजकीयदृष्टीने अतिशय महत्त्वाच्या वाळकी ग्रामपंचायतीची डिसेंबरअखेर मुदत संपत आहे. आगामी निवडणुकीसाठी शुक्रवारी प्रभाग आरक्षण निश्चित करण्यात आले. निवडणुकीला चार महिन्यांचा अवधी असला, तरी सत्ताधार्‍यांसह विरोधकांनी आतापासून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. इच्छुकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती पाठोपाठ वाळकी ग्रामपंचायत निवडणुकीचा राजकीय रणसंग्राम रंगणार आहे.

वाळकी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सहा प्रभागांतील एकूण 17 जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. महादेव मंदिर सभामंडपात मंडल अधिकारी वैशाली साळवे यांच्या अध्यक्षतेखाली, तसेच ग्रामविकास अधिकारी आबूज, कामगार तलाठी मुदगेकर यांच्या उपस्थितीत विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत सोडत पद्धतीने 17 जागांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने ग्रामपंचायत सदस्यामधून सरपंच निवडीचा कायदा केला होता.

मात्र, महाविकास आघाडीचे सरकार पायउतार होऊन एकनाथ शिंदे गट आणि भाजपचे राज्यात सरकार स्थापन झाल्याने महाविकास आघाडीचा सरपंच निवडीचा कायदा रद्द करून पुन्हा जनतेतून सरपंच निवड केली जाणार आहे. वाळकीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आधीच आरक्षित झाल्याने सरपंचपदासाठी इच्छुकांनी आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून वाळकी ग्रामपंचायतीवर भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे समर्थक ज्येष्ठ नेते भाऊसाहेब बोठे यांचे वर्चस्व आहे.

आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत बोठे यांच्या वर्चस्वाला शह देऊन सत्ता परिवर्तन घडविण्यासाठी भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस दिलीप भालसिंग, पंचायत समितीचे माजी उपसभापती रंगनाथ निमसे, ज्येष्ठ नेते व एन. डी. कासार फार्मसी कॉलेजचे संस्थापक एन. डी. कासार, पंचायत समितीचे माजी सदस्य संभाजी कासार, महादेव कासार यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली. त्यामुळे गावातील वातावरण ढवळून निघाले आहे.

जनताच ठरविणार पुन्हा वाळकीचा सरपंच
महाविकास आघाडी सरकारचा सदस्यातून सरपंच निवडीचा कायदा रद्द करून पुन्हा जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केल्याने वाळकीचा आगामी सरपंच कोण? हे जनताच ठरविणार आहे. वाळकीचे सरपंचपद नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्तीसाठी आधीच आरक्षित झाले आहे. सरपंचपदासाठी सत्ताधारी व विरोधकांमधील चुरशीच्या लढतीबरोबरच अपक्षही मैदानात उतरण्याची तयारी करीत आहेत.

प्रभागनिहाय आरक्षण
प्रभाग एक ः 1) अनुसूचित जाती व्यक्ती, दोन ः सर्वसाधारण व्यक्ती, तीन सर्वसाधारण स्त्री, प्रभाग दोन ः 1) सर्वसाधारण व्यक्ती, 2) अनुसूचित जाती स्त्री, 3) सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 3 ः 1) सर्वसाधारण व्यक्ती, 2) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री. प्रभाग 4 ः 1) सर्वसाधारण व्यक्ती, 2) नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, 3) सर्वसाधारण स्त्री प्रभाग 5 ः 1) नागरिकांचा मागास. प्रवर्ग व्यक्ती, 2) सर्वसाधारण स्त्री, 3) सर्वसाधारण स्त्री. प्रभाग 6 ः 1) नागरिकांचा मागास प्रवर्ग व्यक्ती, 2) सर्वसाधारण स्त्री, 3) सर्वसाधारण व्यक्ती.

Back to top button