नगर : संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा | पुढारी

नगर : संतप्त महिलांचा ग्रामपंचायतीवर मोर्चा

खरवंडी कासार, पुढारी वृत्तसेवा : खरवंडी कासार येथील विकासकामे सुरू करावीत व रस्त्याचे काम तातडीने चालू व्हावे, यासाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असताना पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांनीही महिलांसह भाजपचे सरपंच प्रदीप पाटील व ग्रामपंचायतीविरुद्ध आंदोलन केले.

गावांतर्गत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र ते हनुमान मंदिर रस्त्याची अवस्था वाईट आहे. त्यावरून पायी चालणेही मुश्किल झाले आहे. नळाला पाणी नाही, विजेची दुरुस्ती नाही, गटारीची दुर्गंधी गावात पसरली आहे. याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लख होत असल्याचा आरोप महिलांनी केला. पाच दिवसांत रस्त्याची दुरुस्ती व मुरुमीकरण न झाल्यास ग्रामपंचायतीला काळे ठोकण्याचा इशारा महिलांनी दिला आहे.

यावेळी उज्ज्वला अंदुरे, नंदा सांगळे, स्वाती माताडे, मनिषा माताडे, रंजना अंदुरे, संगीता अंदुरे, दीपाली माताडे, संगीता माताडे, आशा ढगे, मुक्ता माताडे आदी महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. यावेळी भाजपा अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष रशिद तांबोळी, अमोल जायभाये, महेश बोरुडे यांनीही आंदोलक महिलांना पाठिंबा दिला.

कामे लवकरच होतील : सरपंच अंदुरे

रस्त्याच्या कामाला मंजुरी व निधी आ.मोनिका राजळे यांनी दिला आहे. कामाचे टेंडर झाले असून, आ.राजळे यांची तारीख घेवून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. इतर सहा कामांचे देखील टेंडर झाले आहेत. काही कामे सुरू केली आहेत. गटार, रस्ते, पेव्हिंग ब्लॉक, दलित वस्तीतील विकासाची अशी सर्व कामे लवकरच सुरू करू, असे सरपंच प्रदीप अंदुरे यांनी सांगितले.

Back to top button