नगर : रस्त्यासाठी कामरगावचे ग्रामस्थ आक्रमक | पुढारी

नगर : रस्त्यासाठी कामरगावचे ग्रामस्थ आक्रमक

नगर, पुढारी वृत्तसेवा : सन 2010 मध्ये नगर तालुक्यातील अकोळनेर ते हिवरेबाजारपर्यंत पंतप्रधान / मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत झालेल्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. दुरुस्तीसाठी कामरगावच्या ग्रामस्थांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचून छोटे-मोठे अपघात होत आहेत. या रस्त्यावरून शाळकरी मुलांची ये-जा असून, हिवरे बाजारकडे जाणारे पर्यटक व गावाला भेट देणारे शासकीय, निमशासकीय अधिकारी व पदाधिकार्‍यांची सतत ये-जा चालू असते. परंतु रस्त्याची पुरती वाट लागली असून ग्रामस्थांना मनस्ताप होत आहे.

हा रस्ता पंतप्रधान सडक योजनेतून पूर्ण झाला असून, त्यांनी तो रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग कडे हस्तांतरित केला आहे. या रस्त्याचे काम जलद गतीने व्हावे व अपघाताचे प्रमाण कमी व्हावे, याबाबतचे लेखी निवेदन अ‍ॅड. प्रशांत साठे, सरपंच तुकाराम कातोरे, अशोक ढवळे यांच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांना निवेदन दिले.

त्या निवेदनात सदरहू रस्त्याचे काम येत्या 15 दिवसांत करा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यावर पालवे यांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवित सदर रस्त्याच्या कामाची त्वरित पाहणी करून त्यासाठी लागणारा आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे कातोरे, साठे, ढवळे यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता किशोर डोंगरे उपस्थित होते.

रस्ता कायमचा पक्का करा

गेल्या 12 वर्षांपासून सदरहू रस्त्याचे काम रखडले आहे. त्यावर ग्रा. पं. ने वेळोवेळी मुरूम टाकून अपघात टाळले आहेत, परंतु रस्त्याचे काम कायमस्वरूपी पक्के व्हावे, अशी ग्रामस्थांची इच्छा आहे, असे अ‍ॅड. प्रशांत साठे यांनी सांगितले.
दरम्यान, अधिकारी व लोकप्रतिनिधी हे जनतेच्या कामासाठीच असतात. शासकीय कामे होत असताना काही तांत्रिक अडचणी येत असतात. त्यामुळे थोडे थांबावे लागते. रस्त्याच्या कामासाठी कामरगावच्या ग्रामस्थांना आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही,असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे यांनी यावेळी ग्रामस्थांना सांगितले.

Back to top button