नगर : ‘सिद्धिविनायक’च्या कर्मचार्‍यांचे आंदोलन | पुढारी

नगर : ‘सिद्धिविनायक’च्या कर्मचार्‍यांचे आंदोलन

सिद्धटेक, पुढारी वृत्तसेवा : अष्टविनायक स्थान असलेल्या श्री सिद्धिविनायक सिद्धटेक मंदिरात कालपासून कर्मचार्‍यांनी सामूहिक काम बंद आंदोलन सुरू केले. देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळाची मनमानी, तसेच व्यवस्थापकाने केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी करून हकालपट्टी करावी, ही प्रमुख मागणी आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचार्‍यांमध्ये असलेली खदखद या आंदोलनामुळे समोर आली. चिंचवड देवस्थान ट्रस्ट या राज्यातील सर्वात मोठे संस्थेत प्रथमच कर्मचारी एकत्र येऊन हे आंदोलन उभे राहिले आहे.

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर, सिद्धटेकसह चिंचवड ही धार्मिक ठिकाणे या देवस्थान ट्रस्टच्या अधिपत्याखाली आहेत. या संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांना तुटपुंजा पगार दिला जातो. या संस्थेचे विश्वस्त मंडळ मनमानी करीत असल्याचा कर्मचार्‍यांचा आरोप आहे. संस्थेतील दोन कर्मचार्‍यांच्या आकस व सूड बुद्धीने बदल्या केल्याच्या निषेधार्थ काल सर्व जण एकत्र आले आहेत. संस्थेतील एकूण कंत्राटी व कायम सुमारे 35 कर्मचार्‍यांनी हे आंदोलन सुरू आहे.

श्री सिद्धिविनायक मंदिरात कंत्राटी व कायम असे सुमारे 35 ते 40 कर्मचारी आहेत. काम बंद आंदोलनामुळे मंदिर व्यवस्थापनात बाधा येऊ नये, यासाठी खासगी कर्मचारी संस्थेमार्फत तत्काळ पर्यायी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. आंदोलनाची चिंचवड देवस्थानने तातडीने दखल घेऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा करण्यासाठी कारभारी शिंदे व कारभारी जोशी यांना पाठवले होते. यावेळी कारभारी शिंदे म्हणाले की, बदली केलेल्या कर्मचार्‍यांची बदली रद्द केली आहे, तसेच पगारवाढीचा मुद्दा विश्वस्त मंडळासमोर मांडणार आहे. सर्व कर्मचार्‍यांनी कामाला सुरुवात करावी.

सिद्धटेक येथील जादा मनुष्यबळ आम्ही कमी संख्या असलेल्या ठिकाणी वळविले आहे. तो कामकाजाचा एक भाग आहे. कर्मचार्‍यांच्या पगार वाढीसंदर्भात व्यवस्थापनाचा विचारविनिमय सुरू आहे.

                                               – मंदार महाराज देव, मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान.

Back to top button