नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच | पुढारी

नगर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच

वाळकी, पुढारी वृत्तसेवा : नगर तालुक्यात चोरट्यांनी सध्या चांगलाच धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (दि.25) पहाटे वडगाव तांदळी येथे किराणा दुकान फोडून 45 हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लांबविली, तर मंगळवारी (दि.26) पहाटे वाळकी येथे देशी दारूचे दुकान फोडून दारूच्या बाटल्या व काही रक्कम चोरून नेली आहे. त्याशिवाय आसपासच्या तीन-चार ठिकाणी उचकापाचक केल्याची घटना घडली आहे.

वडगाव तांदळीत सुनील किसन रणसिंग यांचे किराणा दुकान आहे. ते रविवारी (दि.24) रात्री दुकान बंद करून घरी गेले. सोमवारी (दि.25) पहाटेच्या सुमारास किराणा दुकानाच्या शटरचा कडी-कोयंडा उचकटून दुकानातील ड्रॉवरमधील 45 हजारांची रोकड चोरट्यांनी लांबविली. सकाळी रणसिंग दुकान उघडण्यासाठी गेले असता त्यांना चोरी झाल्याचे समजले.

याबाबत रणसिंग यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे, तसेच वाळकी येथील देशी दारूच्या दुकानातून चोरट्यांनी दारूच्या बाटल्यांचे 2 बॉक्स व काही रक्कम चोरून नेली. मात्र, ऐवज किरकोळ असल्याने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली नाही.

Back to top button