नगर : मालमत्ताधारकांना शंभर टक्के शास्तीमाफी! | पुढारी

नगर : मालमत्ताधारकांना शंभर टक्के शास्तीमाफी!

नगर, पुढारी वृत्तसेवा : थकबाकी वसूल झाल्याशिवाय विकास कामे होणे अवघड आहे. त्या पार्श्वभूमीवर शंभर टक्के शास्ती माफी देण्याचा विचार असून, येत्या दोन दिवसांत शंभर टक्के शास्ती माफी देण्यात येईल, असे आयुक्त डॉ. प्रदीप जावळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

महापालिकेची मालमत्ताधारकांकडे सुमारे 232 कोटींची थकबाकी आहे. थकबाकी वसूल झाल्याशिवाय कामे होणे कठीण आहे. त्याच पार्श्वभूमीवर आमदार संग्राम जगताप यांनी मालमत्ता धारकांना शास्ती माफी द्यावी, याबाबत आयुक्त डॉ. प्रदीप जावळे यांना पत्र दिले होते. त्यानुसार मालमत्ताधारकांना शंभर टक्के शास्तीमाफी देण्याचा मनपाचा विचार आहे. त्यासाठीची पडताळणी सुरू आहे. वसुलीसाठी मनुष्यबळाची अडचण आहे. 2005 मध्ये कर्मचारी भरती झाली त्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया न झाल्याने कर्मचार्‍यांची संख्या कमी झाली आहे. परिणामी वसुली करण्यासाठी अडचणी येत आहेत. एजन्सीमार्फतही वसुली करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांत शंभर टक्के शास्ती माफी देण्याचे विचाराधीन आहे.

मलनि:स्सारण प्रकल्पाला गती

महापालिकेच्या मलःनिस्सारण प्रकल्प उभा करण्यासाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरू होता. मलःनिस्सारण प्रकल्पासाठी निधी मिळाला आणि 2017 मध्ये कार्यरंभ आदेश मिळाला. प्रत्यक्षात कामाला सुरूवात झाली मात्र, अद्याप काम पूर्ण झालेले नाही. संबंधित ठेकेदाराच्या दंडात वाढ करून मलःनिस्सारण प्रकल्पाचे काम मार्गी लावण्याचा मानस आहे, असे आयुक्त डॉ. जावळे म्हणाले.

तूर्तास अतिक्रमण मोहीम नाही

शहरात मोठ्या प्रमाणात पत्रा शेडची गाळे तयार झाली आहे.त्यात अनेक ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे. मात्र, सध्या कोणतीच मोहीम आखली जाणार नाही. त्या सर्व पत्र्याच्या गाळ्याचे सर्वेक्षण करण्यात येईल. कामाचा प्राधान्यक्रम ठरून अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येईल, असेही आयुक्त डॉ. जावळे म्हणाले.

सव्वाशे कोटींपेक्षा जास्तीचे देणे!

महापालिकेला कर्मचार्‍यांच्या पगारा व्यतिरिक्त सव्वाशे कोटींपेक्षा जास्ती देणे आहे. विविध विकास कामांचे पैशांसह अन्य कामाचे देणे बाकी आहे. त्यामुळे खर्चाचा तळामेळ बसविताना नाकी नऊ येत आहेत. वसुलीसाठी लोकांना संधी देणे अपेक्षित आहे, असे आयुक्त जावळे म्हणाले.

Back to top button