केवळ 7 टक्के नागरिकांना बुस्टर डोस, राहाता तालुक्यातील चित्र | पुढारी

केवळ 7 टक्के नागरिकांना बुस्टर डोस, राहाता तालुक्यातील चित्र

प्रमोद कुंभकर्ण :

कोल्हार : पुढारी वृत्तसेवा : शासनाच्या आरोग्य विभागाने गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण अमृत महोत्सवाच्या अंतर्गत मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली. परंतु, नागरिकांनी याकडे सपशेल पाठ फिरविली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राहाता तालुक्यात अद्याप केवळ 7 टक्के नागरिकांनी बुस्टर डोस घेतला असल्याची माहिती राहता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप यांनी दैनिक ‘पुढारी’ शी बोलताना दिली.

कोरोना महामारीची चौथी लाट राज्यात येऊ पाहत असतानाच राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून लसीकरण अमृत महोत्सव अंतर्गत 15 जुलै 2022 पासून गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर व उपकेंद्रावर 18 ते 59 या वयोगटातील नागरिकांसाठी मोफत लसीकरण बुस्टर डोस देण्यास प्रारंभ झाला आहे. राहाता तालुक्यात हा बुस्टर डोस घेण्यासाठी नागरिकांचा प्रतिसाद अत्यल्प असल्याचे दिसून येत आहे.

15 जुलैपासून या मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाल्यापासून बुधवार (दि.20 जुलै) पर्यंत राहता तालुक्यातील 18 वर्षांवरील केवळ सात टक्के नागरिकांनी फक्त हा बुस्टर डोस घेतलेला आहे. कोरोना लसीकरणाचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सहा अथवा नऊ महिन्याच्या कालावधीनंतर हा तिसरा अथवा बुस्टर डोस घेण्याचा कालावधी ठरविण्यात आला होता. काही नागरिकांनी याचा लाभ घेतला, तर अनेक जण या तिसर्‍या डोस घेण्यापासून वंचित राहिले.

प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोफत लसीकरण बंद झाल्यानंतर खासगी दवाखान्यातून अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. परंतु, राज्यात काही ठिकाणी कोरोनाच्या चौथ्या लाटेने डोके वर काढताच शासनाच्या आरोग्य विभागाने गावागावांतील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविड लसीकरण अमृत महोत्सवाच्या अंतर्गत मोफत बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली.

12 वर्षांवरील मुलांनाही बुस्टर डोस
तालुक्यातील विविध शाळांमधून 12 ते 14 व 15 ते 17 वयोगटातील मुलांना देखील बुस्टर डोस देण्यास सुरुवात केली असल्याचे डॉ. संजय घोलप यांनी सांगितले. दरम्यान कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्रावर 1350 नागरिकांनी बुस्टर डोसचा लाभ घेतल्याची माहिती डॉ. घोलप यांनी दिली. डॉ.संजय घोलप, कोल्हार प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ.मोरे, तसेच डॉ. पारखे यांनी बुस्टर डोस लसीकरणाबाबत जनजागृती करून डोस घेण्याबाबत नागरिकांना आवाहन करीत आहे.

Back to top button