पाथर्डी : भरदिवसा 2 लाखांची चोरी, चकेवाडीतील प्रकार | पुढारी

 पाथर्डी : भरदिवसा 2 लाखांची चोरी, चकेवाडीतील प्रकार

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील चकेवाडी येथे राहणार्‍या अंकुश धोंडिबा जिवडे यांच्या बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी भर दिवसा चोरी करून सुमारे दोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी अकरा ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. पाथर्डी पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंकुश जिवडे व त्यांच्या पत्नी आसराबाई जिवडे हे घराला कुलूप लावून बाजूला असलेल्या शेतामध्ये बाजरीचे पीक खुरपत होते. गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अंकुश जिवडे हे जनावरांना गवत टाकण्यासाठी घरी आले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा दिसला. त्यामुळे जिवडे हे घरात शिरून पाहिले असता, घरात कोणी दिसले नाही.

घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले. जवळच खुरपत असताना जिवडे यांनी पत्नीला आवाज देऊन घराकडे बोलावून घेतले. पत्नीला विचारले की, आपले घर उघडे कसे? त्यावर पत्नीने सांगितले की, मी सकाळी कुलूप लावून चावी माझ्याजवळ ठेवली होती. खुरपणीसाठी आमच्या शेतात गेलो असता, घराचे कुलूप तोडून कोणीतरी चोरी केली.

घरातील कपाट ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार रुपये चोरून नेला. या चोरीच्या घटनेत एक लाख एकोणतीस हजार रुपये किमतीचे त्र्येचाळीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, छत्तीस हजार रुपयांचे बारा ग्रॅमची सोन्याचे मिनी गंठण, एकवीस हजार रुपयांचे सात ग्रॅमचे सोन्याची बोर माळ, तीन हजार रुपयांची एक ग्रॅम सोन्याची नथ आणि दहा हजार रुपये रोख असा एकूण एक लाख 99 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याची फिर्याद अंकुश जिवडे यांनी दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी घटनास्थळी दिली.

Back to top button