संगमनेर : यंदा प्रथमच दुथडी वाहतेय प्रवरामाई! | पुढारी

संगमनेर : यंदा प्रथमच दुथडी वाहतेय प्रवरामाई!

संगमनेर शहर : पुढारी वृत्तसेवा : भंडारदरा आणि निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने या दोन्ही धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे निळवंडे धरणातून सोडलेल्या पाण्यासह पाणलोट क्षेत्रात येणार्‍या छोट्या नद्या, नाल्यांच्या माध्यमातून जमा होणार्‍या पाण्यामुळे संगमनेर तालुक्यात प्रवरा नदीला पूर आला आहे.

नदी दुथडी भरून वाहू लागल्याने ओझर बंधारा ओव्हर फ्लो झाला आहे. 6329 क्यूसेकने ओझर बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. भंडारदरा धरणातून काल (गुरुवारी) सकाळी 6 वाजता 3595 क्यूसेकने प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू होता. हे पाणी पुढे निळवंडे धरणात येते. निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात 5367 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून काल गुरुवार (दि. 21) सकाळी 10 वाजेच्या सुमारास 5661 क्युसेकने पाणी ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून प्रवरा नदी पात्रात झेपावत होते.

ओझर बंधार्‍याच्या भिंती नजीक असणार्‍या डाव्या व उजव्या गाळमोरीतून प्रत्येकी 334 क्यूसेक असे एकूण 6329 क्यूसेकने प्रवरा नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. या पावसाळ्यात (दि.14) रोजी संध्याकाळी 5 वाजेपासून डावा व उजवा कालवा बंद करून ओझर बंधार्‍याच्या भिंतीवरून प्रवरा नदी पात्रात ओव्हर फ्लो सुरू करण्यात आला होता, मात्र काल सकाळी 10 वाजता डाव्या कालव्याने 104 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

उजवा कालवा मात्र अजून बंद आहे. रहिमपूर परिसरातील शेतात पाणी घुसायला सुरुवात झाल्याने शेती पिकांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ओझर बंधारा ओव्हर फ्लो झाल्याने बंधार्‍याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी काठावरील गावातील शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ओझर बंधार्‍याच्या या पूरस्थितीवर पाटबंधारे विभागाचे वायरलेस ऑपरेटर एल.के. खरात, डी.जी. गिते, चौकीदार व्ही.व्ही. मंडलिक, एम. टी. दातीर, आर.एस. गुंजाळ आदी कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. पावसामुळे अकोले आणि संगमनेर तालुक्यात येणार्‍या छोट्या नद्या आणि नाल्यांचे पाणी प्रवरा नदी पात्रात जमा होत असल्याने प्रवरा नदी या हंगामात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहू लागली आहे.

नदीकाठच्या शेतात पाणी..!
ओझर बंधारा ओव्हरफ्लो झाला असून, बंधार्‍या नजीक पाण्याचा फुगवटा निर्माण झाल्याने बंधार्‍याच्या पश्चिमेला असणार्‍या रहिमपूर परिसरातील नदीकाठच्या शेतात पाणी घुसायला सुरुवात झाली आहे.

Back to top button