नगर : राहुरीच्या पूर्व भागाला पावसाचे टॉनिक | पुढारी

नगर : राहुरीच्या पूर्व भागाला पावसाचे टॉनिक

वळण, पुढारी वृत्तसेवा : राहुरी तालुक्याच्या पूर्व भागात गेल्या आठवड्यापासून अधून- मधून होत असलेल्या संततधारेमुळे शेतातील ऊस, मका, सोयाबीन, घास आदी पिकांना पोषक असे टॉनिक मिळाल्याने ही सर्व हिरवीगार पिके डौलाने उभी आहेत.

काळ्या आईने जणूकाही आपल्या अंगावर हिरवा शालू पांगरल्याचे हे विलोभनीय चित्र सध्या सर्वत्र पहावयास मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांनंतर दुबार पेरणी सह पाऊस कमी वा जादा असे काही एक संकटाला सामोरे जाण्याची वेळ आली नसल्याने शेतकरी राजा आनंदी असून, मोठ्या आशेने उभ्या असलेल्या पिकाकडे पहात आहे.

चालू वर्षी राहुरी तालुक्यात पावसाळा एक महिना उशिराने आला. त्यापूर्वीच बळीराजांनी शेतीची मशागत करून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी जय्यत तयारी करून ठेवली होती. पहिला पाऊस होताच वाक्यावर या भागातील शेतकर्‍यांनी सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांची पेरणी केली. त्यामुळे ही कोळी पिके संततधारणे चांगल्या प्रकारे वाढली. हिरवीगार झाली.

अनेक शेतकर्‍यांचा खोडवा व नवीन लागण केलेला ऊस मोठ्या डौलाने रानमाळावर डौलत आहे. सध्या सर्वत्र हिरवेगार पिके माणसांना आकर्षित करीत आहे. बर्‍याचदा यापूर्वी शेतकर्‍यांना काळ्या आईची ओटी बी बियानाणे भरून उगवणीकडे डोळे लावून बघण्याची वेळ येते. यंदा मात्र ती वेळ आली नाही. बहुतांश क्षेत्रावर केलेली पेरणी उगवण होऊन व्यवस्थित आल्याचे समाधान आहे.

Back to top button