नगर : एकच सूर अन् स्वच्छ झाले पंढरपूर..! | पुढारी

नगर : एकच सूर अन् स्वच्छ झाले पंढरपूर..!

पारनेर, पुढारी वृत्तसेवा : युवा चेतना फाऊंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या संयुक्त विद्यमाने तसेच सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल 300 स्वयंसेवकांनी सगळ्यांचा ‘एकच सूर स्वच्छ करू पंढरपूर’ या घोषवाक्याखाली पंढरपूरमध्ये स्वच्छता अभियान राबविले.

आषाढी वारीनंतर पंढरपूर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरते, ही सर्व घाण या स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून साफ करण्यात आली. गेल्या 8 वर्षांपासून युवा चेतना फाउंडेशन आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ही स्वच्छता मोहीम पंढरपूरमध्ये राबविण्यात येते.
या वर्षी नगर, शेवगाव, निघोज, पुणे व सोलापूर येथून जवळपास 300 पेक्षा जास्त स्वयंसेवक या मोहिमेत सहभागी झाले होते.

आठवर्षांपासून सुरू आहे सेवा

सामाजिक भान ठेवत कुठल्या मदतीची अपेक्षा न ठेवता हे तरुण गेल्या 8 वर्षांपासून ही सेवा करत आहेत. आषाढी एकादशीनंतर वारकरी घराकडे परतल्यानंतर गर्दी कमी होते. वारकर्‍यांची गर्दी कमी झाल्यावर ही मोहीम हे युवक राबवितात. यात वेगवेगळे गट तयार करून व प्रत्येक गटाचा एक प्रमुख नेमून वेगवेगळ्या भागांत हे गट पाठवून स्वच्छता मोहीम राबविण्यात येते.

यावर्षी 52 एकरांचे वाखरी वारीतळ, पालखी मार्ग, गोपाळपूर, वाळवंट परिसर, मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ. आदी ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. यामध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, द्रोण, ग्लास, केळ्यांच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्रभागेतील कपडे जमा करण्यात आले.

स्वच्छेतेत विठ्ठल पाहून, हे तरुण स्वच्छता करतात. ही मोहीम यावर्षी केशव सायकर आणि राहुल आळेकर या दोन स्वयंसेवकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या दोन स्वयंसेवकांचे काही दिवसापूर्वी अपघाती निधन झाले होते. तर यापुढेही ही मोहीम अशीच सुरु ठेवण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांनी सांगितले. तसेच जास्तीत जास्त तरुणांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन देखील त्यांनी केले. मोहिमेत एका 70 वर्षीय आजीने उत्सुकतेने सहभाग घेतला.

या मोहिमेत अमर कळमकर, मिथून धनराज, अ‍ॅड. सुनील गडाख, विलास हारदे, ठकसेन गायके, पांडुरंग राजगुरू, योगेश काकडे, पूनम थोरात, अशोक चिंधे, उमेश आमटे, अमोल म्हस्के, योगेश काकडे, सोमनाथ भोसले, योगेश सासवडे, विदुला कुलकर्णी, महेश उबाळे, परम काकडे, सिद्धी मंत्री सहभागी झाले होते.

सामाजिक भान ठेवत हे अभियान आम्ही राबवितो. या स्वच्छतेच्या माध्यमातून आम्ही तरुणांवर स्वच्छतेचे संस्कार देखील रुजवतो. जातीत जास्त युवकांनी यामध्ये सहभागी झाले पाहिजे. याकामी आमदार नीलेश लंके, कन्हैया उद्योग समूह व वृत्ती फाउंडेशन, पुणे यांनी सहकार्य केले.

                                                                   – अमर कळमकर, सामाजिक कार्यकर्ते

Back to top button