नगर : मुळा पाणलोटामध्ये पावसाचे कमबॅक | पुढारी

नगर : मुळा पाणलोटामध्ये पावसाचे कमबॅक

राहुरी, पुढारी वृत्तसेवा : मुळा धरण पाणलोट क्षेत्रावर थांबा घेतलेल्या पावसाने कमबॅक करीत जोरदार आगमन झाल्याने पाणी आवकेत वाढ दिसत आहे. दरम्यान, धरण साठा 60 टक्के झाला आहे. धरण साठ्याची नोंद 15 हजार 493 दलघफू झाली आहे.

मुळा धरण पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्रावर पावसाने थांबा घेतला होता, मात्र सोमवारी आषाढ सरींचा वर्षाव पुन्हा दिसला. लाभक्षेत्रावर रिमझिम सरी कोसळल्याने वातावरणात दिवसभर गारवा निर्माण झाला होता. सतत पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले.
पाणलोट क्षेत्रावर जोरदार पाऊस पडत असल्याचा परिणाम धरण साठ्यावर दिसला. दोन दिवसांपासून मुळाच्या लाभक्षेत्रासह पाणलोट क्षेत्रावर पावसाने काहीसा थांबा घेतला होता. त्यामुळे धरणाकडे होणारी नवीन पाण्याची आवक थबकली होती.

सोमवारी सकाळी 6 वाजता धरणाकडे 4 हजार 429 क्यूसेक आवक होत होती. दुपारी 12 वाजता पावसाचा वर्षाव सुरू झाल्याने आवक 5 हजार 990 क्यूसेकपर्यंत वाढली. सायंकाळी 6 वाजता आवकेत चांगली वाढ झाली. कोतूळ सरिता मापन केंद्र येथून धरणाच्या बॅक वॉटरमध्ये 10 हजार 342 क्यूसेकने नवीन पाणी जमा होत असल्याची नोंद सायंकाळी 6 वाजता नोंदविण्यात आली.

पाण्याबाबत शाखा अभियंता शरद कांबळे यांच्या माहितीनुसार सायंकाळच्या सत्रामध्ये पावसात अधिक वाढ झाली. पाणलोट क्षेत्रासह लाभक्षेत्राच्या पावसाकडे मुळा पाटबंधारे विभाग लक्ष देऊन आहे. पाणलोट क्षेत्रावर पावसाचा जोर वाढल्याने आवकेत वाढ होण्याची चिन्हे आहेत. 31 जुलैपर्यंत धरण साठा 19 हजार 900 दलघफू असेपर्यंत धरणाचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. परंतु, पावसाचा जोर वाढल्यास पाणी साठ्याने 20 हजार दलघफूची पातळी गाठल्यास पाणी सोडावे लागेल, असे कांबळे यांनी सांगितले.

Back to top button