नगर : चौकातील वाहतूक कोंडी संगमनेरकरांना डोकेदुखी | पुढारी

नगर : चौकातील वाहतूक कोंडी संगमनेरकरांना डोकेदुखी

संगमनेर शहर, पुढारी वृत्तसेवा : पुणे रस्त्यावरील जुने पोस्ट कार्यालय ते जोर्वे नाका परिसरात छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण व बेशिस्त वाहनधारकांमुळे नाशिक-लोणी अन् पुणे भागातून येणार्‍या जाणार्‍या वाहनांची तीन बत्ती चौक ते जुन्या पोस्ट व जोर्वे नाक्यापर्यंत वाहनांची सर्वाधिक गर्दी होत असते. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली. वाहतूककोंडीची वाहनचालकांसह संगमनेरकर नागरिकांना कायमचीच डोकेदुखी होत आहे.

संगमनेर शहरातून पुणे-नाशिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. या अतिक्रमणधारकांनी वाहतूक कोंडीचा कुठल्याही प्रकारचा विचार न करता रस्त्याजवळ दुकान टाकून बस्तान बांधले आहे. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची पार्किंगची सुविधा व दुकानात येणार्‍या जाणार्‍यांची वाहने अगदी रस्त्यातच उभी केली असल्यामुळे वाहतूक कोंडी नित्याची होत असते. त्यात पुणे-नाशिक-लोणी या तीनही बाजूने येणारी वाहने तीन बत्ती चौकात येत असते. वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अवघा एकच पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी त्यांनाही नाकीनऊ येत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

गेल्या दीड-दोन दशकांत शहराच्या जुन्या बाजारपेठेतील अनेक नामांकित व मोठ्या व्यापार्‍यांनी दुकाने हमरस्त्यावर थाटण्यास व्यापार्‍यांनी सुरुवात केली आहे. त्यामुळे शहराच्या जुन्या बाजारपेठेचे महत्त्व कमी होत आहे. आता बाजारपेठेतून अनेक व्यापार्‍यांनी आपली दुकाने नवीन नगर रोड, नाशिक रोड, नवीन अकोले रोड, लिंक रोड, पुणे रोड, लोणी रोड भागात सुरू केले असल्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी वाढतच आहे. त्यातच या भागात अतिक्रमण होऊ लागल्याने वाहतूक कोंडी कायमच होत असते.
बसस्थानकाच्या बाहेर रस्त्यावरच काळ्या, पिवळ्या जीप आणि रिक्षा उभ्या असल्यामुळे त्याचाही फटका वाहतूक कोंडीला बसत आहे. शहरातील रस्त्यावरील अतिक्रमणधारक व बेशिस्त वाहनधारकच वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत असून त्यांच्याकडून वाहतूक नियम पायदळी तुडविले जात आहे. यांचा मनस्ताप नागरिकाला सहन करावा लागत आहे.

वाहतूक शाखा कार्यान्वित करणे काळाची गरज

संगमनेर शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी जिल्हा पोलिसप्रमुख यांच्या आदेशान्वये संगमनेरात स्वतंत्र पोलिस वाहतूक शाखा कार्यान्वित करण्यात आलेली होती. त्यासाठी स्वतंत्र सहाय्यक पोलिस निरीक्षकांची सुद्धा नेमणूक करण्यात आलेली होती. परंतु, मध्यंतरीच्या काळात ही शाखा प्रकाश करून शहर पोलिस ठाण्याला जोडण्यात आली. त्यामुळे संगमनेर शहरात पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. हा वाहतूक कोंडीचा प्रश्न दूर करण्यासाठी पुन्हा एकदा कार्यक्षम अशी वाहतूक शाखा कार्यान्वित करणे गरजेचे आहे.

Back to top button