नगर : इमामपूर शिवारात आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर | पुढारी

नगर : इमामपूर शिवारात आरोग्याचा प्रश्न बनला गंभीर

नगर तालुका, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इमामपूर येथील भूमिगत गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने, गावाच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

उद्धव मोकाटे यांनी पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंत्यास याबाबत निवेदन दिले आहे. त्यामध्ये इमामपूर येथील जुन्या मराठी शाळेजवळ सुमारे दीड वर्षांपूर्वी भूमिगत गटार योजना झालेली आहे. सदर योजनेचे पाईप आवश्यक त्या खोलीवर जमिनीत गाडले गेले नसल्याने, पाईप वारंवार फुटून सांडपाणी उघड्यावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लहान मुले, वयोवृद्ध यांचे आजारी पडण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या गटार योजनेच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी मोकाटे यांनी केली आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे.

ग्रामसेवकाचा हलगर्जीपणा

या भूमिगत गटार योजनेचे काम बोगस पद्धतीने झाले आहे. पाईप फुटल्यामुळे मैलामिश्रित पाणी घरासमोरील परिसरात उघड्यावर येत आहे. त्याच्या दुर्गंधीमुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत वारंवार सांगूनही ग्रामसेवक हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप गोकुळदास आवारे यांनी पंचायत समिती तालुका आरोग्य अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात केला आहे.

‘ते’ ग्रामसेवक नेहमीच वादात

या ग्रामसेवकाची जेथे नियुक्ती असेल तेथे ते नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडलेले आहेत. खोसपुरी येथे त्यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून घेण्याचा प्रकार घडला होता. धनगरवाडी ग्रामस्थांनी त्यांच्या बदलीची मागणी केली होती. इमामपूरमध्येही त्यांचे काम नेहमीच वादग्रस्त राहिलेले आहे, असे उद्धव मोकाटे यांनी म्हटले आहे.

Back to top button