नगर : नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्ष सरसावले | पुढारी

नगर : नगरपरिषद निवडणुकीसाठी पक्ष सरसावले

पाथर्डी तालुका : अमोल कांकरिया : पाथर्डी नगर परिषदेची निवडणूक सर्वच पक्षांनी स्वबळावर व ताकदीने लढविण्याचा नारा पक्षांच्या बैठकांतून दिल्याने निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस यांची महाविकास आघाडी होते की नाही, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. दुसरीकडे भाजपच्या इच्छुकांनी पहिल्यापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आम आदमी पक्षानेही आपले उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाथर्डी नगर परिषदेच्या निवडणुकीला चांगली रंगात येणार आहे.

या निवडणुकीत अनेक पक्षांचे इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत. त्यामुळे आगामी तिरंगी-चौरंगी होण्याचीच शक्यता अधिक आहे. भाजपविरुद्ध महाविकास आघाडी की, सगळे पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवतात, हे लवकरच स्पष्ट होईल. सर्वच पक्षांनी स्वतंत्र निवडणूक लढविल्यास भाजपच्या उमेदवारांना या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. मागील पाच वर्षे पाथर्डी नगरपरिषदेवर भाजपची सत्ता आहे. या निवडणुकीत भाजपला हरविण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी तयार केल्यास, त्याचा मोठा फायदा सर्वच पक्षांना मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.

सोशल मीडियावरून दावेदारी

निवडणुका जाहीर झाल्यानंतर सोशल मीडियावरून इच्छुकांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली आहे. ज्या प्रभागातून निवडणूक लढवायची, त्याचा उल्लेख करून ‘होय मी लढणार, होय मी तयार आहे, आम्ही भिडणार, प्रभागातील समस्येसाठी, वीज, पाणी, गटार व रस्ते या समस्यांसाठी मी सदैव तुमच्या सेवेत असणार’, असे मजकूर व इच्छुकांच्या छायाचित्रांसह फिरत आहेत. ही पोस्टरबाजी नवख्या उमेदवारांची जास्त आहे. जुने इच्छुक मतदारांच्या गाठीभेटी घेऊन संपर्क वाढवून निवडणुकीची व्युहरचना आखणे, या कामात ते सक्रिय आहेत.

सोमवारी (दि. 11) राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांच्या उपस्थितीत पार पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अ‍ॅड. प्रताप ढाकणे व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण ताकतीने लढविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला. इच्छुकांनी अ‍ॅड. प्रताप ढाकणे यांच्या संपर्क कार्यालयात अर्ज भरून देण्याचे आवाहन तालुकाध्यक्षांनी केले. त्या पाठोपाठ काँग्रेसची बैठक पार पडली.सर्व प्रमुख पदाधिकारी, इच्छुक बैठकीस उपस्थित होते. काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. आघाडी करण्याचे पक्षाचे आदेश असल्यास एकत्रित लढू, असे तालुकाध्यक्ष नासीर शेख यांनी स्पष्ट केले.

पाथर्डी पालिकेवर भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे. निवडणूक स्वबळावर लढविण्यात येणार आहे. पालिकेत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले नगरसेवक जनतेची सेवा करतील, असा विश्वास शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे यांनी व्यक्त केला. रविवारी शिवसैनिकांच्या बैठकीत ते बोलत होते. आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष किसन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीची रणनीती आखण्यात आली असून, पक्षाने इच्छुकांना आवाहन केले आहे.

राजकीय पक्षांची तयारी सुरू

नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने 16 उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर केली आहे. शिवसेनेने 30 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 6 इच्छुकांनी राष्ट्रवादीकडे अर्ज भरून दिले आहेत. भाजपने संभाव्य उमेदवारांची बैठक घेतली आहे.

राष्ट्रवादीचा आघाडी करण्याचा प्रयत्न

आमचा आघाडी करण्याचा प्रयत्न असून त्यासाठी पुढाकार आहे. पाथर्डी नगरपरिषदेच्या निवडणूक संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत बैठक झाली. लवकरच तिन्ही पक्षांची संयुक्त बैठक घेतली जाईल, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे यांनी सांगितले.

Back to top button