नगर : गोदावरीत 80 हजार क्यूसेस विर्सग | पुढारी

नगर : गोदावरीत 80 हजार क्यूसेस विर्सग

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात पर्जन्यवृष्टी झाल्याने दुसर्‍या दिवशी नांदूर मधमेश्वर बंधार्‍यातून 80 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी पात्रातून नाथसागर धरणात सुमारे साडेपाच टीएमसी पाणी नव्याने दाखल झाल्याची माहिती जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी दिली.

दरम्यान कोपरगाव शहरा लगतचा संत जनार्दन स्वामी सेतू पूल पुराच्या पाण्याखाली गेल्याने रहदारी व वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मंगळवारी पावसाने उघडीप दिल्याने गोदावरीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिक महिला मुलांनी मोठी गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातून मंगळवारी सकाळी 72 हजार 717 क्यूसेक पाणी संध्याकाळपर्यंत 80 हजार क्यूसेकपर्यंत पोहचले.
दमदार पावसाने नाशिक जिल्ह्याला झोडपून काढले असून चार दिवसापासून सुरु असलेल्या पावसाचा जोर अद्यापही कायम आहे.
गुरुवारपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

जिल्ह्यातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाच्या दमदार सरी बरसत असल्यामुळे विसर्ग वाढता असल्याने कोपरगाव तालुक्यातील नदीकाठच्या 30 ते 40 गावांना जिल्हा प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पाण्याची वाढ धोका पातळीकडे

कोपरगावच्या गोदावरी नदीपात्रातील साडेपाच मीटर पाण्याची नोंद इशारा पातळी तर साठेआठ मीटरची नोंद धोक्याची पातळी मानली जाते. मंगळवारी सायंकाळपर्यंत गोदापात्रातील पाण्याची लेव्हल पावणे सात मीटर नोंदल्याची माहिती केंद्रीय जलआयोगाचे संजय पाटील यांनी दिली.

Back to top button