राहुरी : ‘मुळा’त 1337 दलघफू पाण्याची वाढ | पुढारी

राहुरी : ‘मुळा’त 1337 दलघफू पाण्याची वाढ

राहुरी : पुढारी वृत्तसेवा : मुळा धरणाच्या पाणी साठ्यामध्ये आषाढी सरींची कृपेने वाढ दिसून आली आहे. धरणाकडे कोतूळ सरिता मापन केंद्राकडून धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सायंकाळी 7 हजार 310 क्यूसेक प्रवाहाने पाण्याची आवक होत आहे. पाणलोट क्षेत्र परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत असताना आवक कमी-जास्त प्रमाणात होत आहे.

मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेले हरिश्चंद्रगड, पांजरे, कोतूळ पट्ट्यामध्ये पावसाचा संततधार सुरूच आहे. आषाढी सरींची कृपा होत असल्याने धरणाकडे कमी जास्त प्रमाणात आवक होत आहे. रविवारी सकाळी 9 हजार 155 क्यूसेक प्रवाहाने नवीन पाणी मुळाच्या बॅकवॉटरमध्ये जमा होत होते. दुपारी 12 वाजता पावसाचा जोर वाढल्याने आवकेत वाढ होऊन सुमारे 12 हजार क्यूसेकपर्यंत आवकेची वाढ झाली होती.

परंतु, रविवारी सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर ओसरल्यानंतर आवक सायंकाळी 6 वाजता 7 हजार 310 क्यूसेक इतकी नोंदविण्यात आली. परिणामी मुळा धरणाकडे होत असलेल्या नवीन आवकेच्या पाण्याने जलसाठा वाढत असल्याचे सुखद चित्र आहे. आषाढी सरींची कृपा पाहता धरण साठा 37 टक्के इतका झाला आहे. 26 हजार दलघफू क्षमता असलेले मुळा धरणामध्ये रविवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत 9 हजार 568 दलघफू इतक्या पाणी साठ्याची नोंद होती.

पाणलोट क्षेत्रावर पावसाचा धो -धो सुरूच असल्याने आवक सुरूच राहिल्यास धरण साठ्यात चांगली वाढ होण्याची अपेक्षा शाखा अभियंता शरद कांबळे यांनी व्यक्त केली आहे. मुळा धरणामध्ये मान्सून प्रारंभापासून 1 हजार 337 दलघफू इतके नव्याने पाणी जमा झालेले आहे.

धरणाच्या पाणी साठ्याकडे पाटबंधारे विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष देऊन आहेत. मुळा धरण पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता कांबळे यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षापेक्षा यंदा कमी पाणी साठ्याची नोंद आहे. परंतु, आषाढी सरींनी अशीच कृपा केल्यास 10 ते 15 दिवसातच मुळा धरणाचा पाणीसाठा 50 टक्के पाणीपातळी ओलांडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Back to top button