
शिर्डी : पुढारी वृत्तसेवा : सेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपकडे गेले. आता उद्धव ठाकरे यांना आम्हाला परत बोलवायचे असल्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना प्रथम विचारावे लागेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर यांनी केले. केसरकर यांनी शिर्डीत श्रीसाई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधला. विश्वस्त सचिन गुजर, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे यावेळी उपस्थित होते.
किरीट सोमैय्या यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानाबाबत माजी मंत्री आ. दीपक केसरकर यांनी परखड शब्दात नाराजी व्यक्त केली. आ. केसरकर म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप आमदार व पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत शिवसेनेचे पक्ष प्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द काढायचे नाही. अथवा टीका करायची नाही,असे ठरले होते. परंतू दुर्दैवाने किरीट सोमैय्या त्या बैठकीला उपस्थित नसल्याने त्यांनी याची कल्पना नसेल म्हणून त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल टीका- टिप्पणी केली आहे. याबाबत मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले तर जाणार का? या प्रश्नावर आ. केसरकर म्हणाले की, आपल्याला जर कुटुंब प्रमुखांनी आशीर्वाद द्यायचे म्हटलं तर तेथे जाऊन ते आशीर्वाद घ्यायलाच लागतात. ते आशीर्वाद घेताना त्याच्यामध्ये कुठे राजकारण नसतं. शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे हृदय जसे मोठे होते तसेच मोठे हृदय आमच्या उद्धव ठाकरे यांचेसुद्धा आहे. बाळासाहेब ठाकरे सुप्रीमच्या भूमिकेमध्ये होते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीसुद्धा त्याच भूमिकेमध्ये रहावे. सर्वांना आशीर्वाद द्यावेत. सर्वांना मार्गदर्शन करावे, मात्र आता भाजप-सेनेच्या विधीमंडळ पक्षाची युती झाल्याने आमचे नवीन नाते जोडले गेले आहेत. हे नाते अभंग राहणार असून, उद्धव ठाकरे यांना वाटत असेल की, ही माझी मुलं परत आली पाहिजे तर त्यांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलावेच लागेल.
.. म्हणून शिवसेना अडचणीत!
उद्धव ठाकरेंना तेथे बसलेले काही नेते सल्ला देतात. त्यामुळे हे सर्व घडत असल्याने खर्याअर्थाने सेना अडचणीत आल्याचे आ. दीपक केसरकर म्हणाले.
शेवट गोड व्हावा!
सध्याच्या राजकीय परिस्थितीवर बोलताना, मला वाटतं की, यासर्व राजकीय गोष्टींचा शेवट गोड व्हावा, अशी प्रतिक्रिया आ. दीपक केसरकर यांनी दिली.
आधी जखम,… नंतर मलम लावायचा..!
भविष्यात एकत्र यायचे असेल तर एकमेकांच्या विरोधात वक्तव्य करून मने दुखावायला नको. आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गटनेता पदावरून काढून टाकण्याचे आदेश दिले आणि लगेच त्यांना भेटायला माणसं पाठवली. आता भावना गवळींना पदावरुन काढून टाकले. त्यांच्याकडेही चर्चेला माणसं पाठवाल. आधी जखम करायची आणि नंतर मलम लावायचा. त्याच्यापेक्षा जखमच करू नका.