सुरेगावात बिबट्या जेरबंद | पुढारी

सुरेगावात बिबट्या जेरबंद

कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील कदमवस्ती परिसरात मागील काही दिवसांपासून पाळीव प्राण्यांची शिकार करणार्‍या बिबट्याला सुरेगाव ग्रामस्थांच्या मदतीने सुभाष शेट्टी यांच्या शेतातील गट नंबर 200 मध्ये जेरबंद करण्यात वनविभागाला यश आल्याची माहिती सुरेगावचे सरपंच शशिकांत वाबळे यांनी दिली.

सुरेगाव परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. काही ग्रामस्थांना बिबट्याने दर्शन दिले. सध्या खरिपाच्या पेरणीला वेग आला आहे. शेतीच्या मशागतीचे कामे जोरात सुरु असली तरी बिबट्याच्या दहशतीमुळे शेतातील कामासाठी जातांना शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा, अशी मागणी सरपंच वाबळे यांनी वनअधिकारी प्रतिभा पाटील यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेऊन शुक्रवारी (दि.1) सायंकाळी कदम वस्ती परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Back to top button