नगर : जनतेतून सरपंच निवडीसाठी परिषद आक्रमक | पुढारी

नगर : जनतेतून सरपंच निवडीसाठी परिषद आक्रमक

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : सरपंचांची निवड थेट जनतेतूनच केली जावी, या मागणीसाठी सरपंचांचे संघटन असलेली सरपंच परिषद पुन्हा आक्रमक झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरपंच परिषदेने 11 जुलै रोजी राज्यातील सर्व तालुक्यातील तहसील कार्यालयाला या मागणीचे निवेदन देऊन राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांनी दिली.

राज्यात युतीचे सरकार स्थापन झाले आहे. मागील वेळी युतीची सत्ता असताना थेट जनतेतून सरपंच हा क्रांतिकारी निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. महाविकास आघाडीच्या काळात हा आदेश रद्द करण्यात आला. तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ग्रामविकासामध्ये काम करणार्‍या घटकाला न्याय देण्याच्या भूमिकेतून थेट जनतेतून सरपंच निवडीचा कायदा केला होता. त्यामुळे खर्‍या अर्थाने ग्रामीण भागाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून न्याय मिळाला होता.

आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी हा निर्णय रद्द करून सरपंचाची निवड सदस्यांमधून ठेवली. त्यावेळी सरपंच परिषदेने राज्यभर तीव्र निदर्शने करून आपला रोष व्यक्त केला होता. आता राज्यात पुन्हा युतीचे सरकार आले आहे. त्यामुळे सरपंच निवडीवेळी होणारा घोडेबाजार, भांडण, वाद टाळण्यासाठी थेट जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घ्यावा, यासाठी सरपंच परिषद राज्यव्यापी आंदोलन करणार आहे.

11 जुलैला राज्यभर तहसीलदारांना निवेदन देऊन जनतेतून सरपंच निवडण्याची मागणी करणार आहोत. तालुका पातळीवरील पदाधिकारी तहसीलदारांना, जिल्हा पातळीवरील पदाधिकारी जिल्हा प्रशासनाला निवेदन देणार आहेत. सरपंचांची निवड थेट जनतेतून होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच परिषद प्रयत्नशील आहे.

– आबासाहेब सोनवणे, जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद

सदस्यातून सरपंच निवडीवेळी सदस्य फोडाफोडी, पळवा पळवी, वादविवाद होत असतात. त्याचा परिणाम संपूर्ण पाच वर्ष विरोधाला विरोध म्हणून प्रत्येक विकास कामात गट तट पडतात. यामुळे गाव विकासाला खीळ बसत असते. त्यामुळे गाव विकासासाठी सरपंचांची थेट जनतेतून निवड होणे गरजेचे आहे.

– प्रियंका लामखडे, महिला उपाध्यक्ष, सरपंच परिषद

जनतेतून सरपंच निवडीच्या विधेयकासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात आहोत. त्यांनी आश्वासन दिले आहे. राज्यातील सरपंचांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी 11 जुलै रोजी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारचेे लक्ष वेधणार आहोत.

– दत्ता काकडे, प्रदेशाध्यक्ष, सरपंच परिषद

Back to top button