नगर : पाथर्डी नगरपालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध | पुढारी

नगर : पाथर्डी नगरपालिकेची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी एकूण 21 हजार 353 मतदारांची प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

हरकतीनंतर दहा प्रभागांच्या अंतिम मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यात 10 हजार 852 पुरुष, तर 10 हजार 501 महिला मतदार आहेत. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याने राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे.

नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने 21 जूनला प्रत्येक प्रभागाची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती. या मतदारयादीवर 27 जूनपर्यंत हरकती घेण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मुदतीत तब्बल 703 हरकती दाखल झाल्या होत्या. पालिका निवडणूक विभागाने आलेल्या हरकतींची पडताळणी केली. प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्रांताधिकार्‍यांना अहवाल सादर केला.

पाच जुलै रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात प्रभाग निहाय मतदार पुढीलप्रमाणेः: प्रभाग एक – 998 पुरुष, 836 महिला, प्रभाग 2 -एक हजार सोळा पुरुष, तर 989 महिला, प्रभाग तीन – 1124 पुरुष, तर 1030 महिला, प्रभाग चार ः 1181 पुरुष, तर 1094 महिला. प्रभाग पाच ः 1360 पुरुष, तर 1 हजार 380 महिला, प्रभाग सहा 1127 पुरुष, तर 1164 महिला, प्रभाग सात ः 950 पुरुष, तर 954 महिला. प्रभाग आठ ः 903 पुरुष, तर 913 महिला, प्रभाग नऊ ः 1,145 पुरुष, तर 1132 महिला, प्रभाग दहा ः 1108 पुरुष, तर 1009 महिला अशा एकूण 21 हजार 353 मतदारांची अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाली आहे.

अनेक इच्छुकांनी नवीन मतदारयादी घेण्यासाठी पालिका कार्यालयात गर्दी केली होती. प्रभाग रचनेत बदल झाल्याने इच्छुकांकडून जुळवाजुळव सुरू आहे. अनेक मतदार उपनगरांत रहायला गेले आहेत. त्याचा फायदा उठवत इच्छुकांनी हक्काच्या मतदारांची सोयीनुसार हलवा-हलव केल्याचे बोलले जाते.

आपला कोण? विरोधकांचा कोण?

प्रभागातील मतदारयाद्यांना अंतिम रूप आल्याने निवडणुकीच्या दृष्टीने हालचालींना वेग आला आहे. आपला मतदार कोण विरोधकांचा कोण याची मतदार यादीतून ओळख पटवून माहिती संकलन करण्याचे काम इच्छुक उमेदवारांनी सुरू केले आहे.

Back to top button