नगर : साथीच्या रोगाने पारनेरकर त्रस्त | पुढारी

नगर : साथीच्या रोगाने पारनेरकर त्रस्त

पारनेर : पुढारी वृत्तसेवा : पारनेर तालुक्यामध्ये नागरिक त्रस्त झाले असून सर्दी, खोकला, घसादुखी रुग्ण घरोघरी आढळून येत आहेत. वातावरणातील व पावसामुळे ओलावा निर्माण होत असल्याने तालुक्यात थंडीताप, खोकला, घसा दुखणे या आजारांची साथ निर्माण होऊ पाहात आहे. हे साथीचे रोग रोखण्यासाठी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

आषाढ, श्रावण महिन्यात संततधार पाऊस असतो. या पावसात नवीन पाण्याबरोबर विविध प्रकारचे आजार येत असतात. यात मलेरिया, डेंग्यू, चिकुनगुनियासारखे कीटकजन्य आजार पसरतात. दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, विषमज्वर, काविळीचे आजार पसरतात.
याबाबत गटविकास अधिकारी किशोर माने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले की, पावसाळा चालू झाल्यानंतर ठिकठिकाणच्या नवीन पाण्याची तपासणी केली जात आहे. साठलेल्या खड्ड्यांत डासांची उत्पती होऊ नये, म्हणून ग्रांमपचायतींना असे निरोपयोगी खड्डे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून काही ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात येत आहेत.

सर्दी, खोकल्याचे प्रमाण जास्त

पावसाळ्यात सर्दी, खोकल्याचे प्रमाण जास्त असते. त्या अनुषंगाने आरोग्य कर्मचार्‍यांमार्फत सर्वेक्षण केला जात आहे .
साथीचे आजार विशेषत: लहान मुलांना अधिक प्रमाणात होतात. त्यामुळे पावसाच्या पाण्यापासून, तसेच थंड हवेपासून सर्वांनीच बचाव करणे गरजेचे आहे. साथीचे विकार एकमेकांच्या सहवासाने पसरत असल्याने खोकताना किंवा शिंकताना सर्वांनीच रुमालाचा वापर करणे आवश्यक आहे. पावसाच्या पाण्यापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट, छत्रीचा सक्तीने वापर आवश्यक आहे. डोके किंवा अंग ओले राहिल्याने व त्यावर थंड हवेचा मारा झाल्यानेसुद्धा आजारी पडण्याची शक्यता वाढते. सर्वांनीच पाणी उकळून प्यायला हवे. हलका आहार घेताना पालेभाज्या, कडधान्यांचे प्रमाण आहारात जास्त ठेवावे.

तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांनी मुबलक औषध साठा केला आहे. कर्मचार्‍यांना सज्ज राहण्यास सांगितले आहे, तसेच आरोग्य अधिकारी व डॉक्टरांनी जास्तीत जास्त वेळ मुख्यालयी थांबावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत, असे गटविकास अधिकारी किशोर माने व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांनी सांगितले.
पारनेर तालुका क्षेत्रफाळने मोठा असून तालुक्यतील अनेक भाग दुर्गम आहे. त्यामुळे ऐनवेळी आरोग्य सेवा पोहोचवण्यास अडचण नको, म्हणून आरोग्य विभागाने अगोदरच औषधसाठा, फवारण्या पोहोच केल्या असून सर्व यंत्रणा सज्ज आहे. तालुक्यात जून अखेर जेमतेमच पाऊस झाला असल्याने आतापर्यंत आरोग्य सुरक्षित होते. परंतु आषाढ, श्रावणात संततधार राहिल्यास साथीचे आजार रंग दाखवयाला सुरुवात करतात. त्यांना तोंड देण्यासाठी तालुक्याची आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.

Back to top button