बायको रुबाबात म्हणाली..नवर्‍याचा अन् पोलिस दादाही म्हणाले.. ओक्के; मोबाईलमुळे चोराचे बिंग फुटले! | पुढारी

बायको रुबाबात म्हणाली..नवर्‍याचा अन् पोलिस दादाही म्हणाले.. ओक्के; मोबाईलमुळे चोराचे बिंग फुटले!

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : ‘बायको म्हणाली… अहो, कुठेय तुम्ही.. पोलिस दादा म्हणाले, कोण पाहिजे तुम्हाला, हा फोन कोणाचा आहे? तिकडून ती रुबाबात म्हणाली, ‘माझा नवरा, राजूचा (नाव बदलले).. पोलिसही म्हणाले ओक्के; मग काय, नवर्‍याच्या चोरीचे बिंग फुटले. आता, पोलिस त्याच्या शोधात आहेत.

पाथर्डी शहारातील शेवगाव रस्त्यावरील एका कापड दुकानात चोरट्याने शटर वाकवून चोरी केली. या चोरट्याने पाच हजार रुपयांच्या जिन्स पॅन्ट व तीस हजार रुपयांची रोख रक्कम, असा एकूण 35 हजारांचा ऐवज लंपास केला. ही चोरीची घटना सोमवारी पहाटे उघडकीस आली. चोरटे चोरी करून निघून गेले; मात्र, आपला मोबाईल दुकानातच विसरून गेले. तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. तेवढ्यातच विसरलेल्या मोबाईलवर चोरट्याच्या बायकोचा फोन आला आणि नवर्‍याच्या चोरीचे बिंग फुटले.

दुकानातील काउंटरजवळ एक आकाशी रंगाचा व्हिवो कंपनीचा चोरट्यांचा मोबाईल मिळून आला. तुषार शेकडे यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण, पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस ज्ञानेश्वर रसाळ, संदीप कानडे तपास करत असून, पोलिस त्याच्या शोधात आहेत.

चोरीत 10 जिन्सच्या पॅन्टचाही समावेश

पाथर्डीतील शेवगाव रस्त्यावर एका नावाजलेले कपड्यांचे दुकान असून, सोमवारी दुकान बंद करून दुकान मालक तुषार शेकडे घरी गेले. त्यानंतर मंगळवारी पहाटे दुकानाची चोरी झाल्याचे समजले. दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानाच्या काउंटरमधील रोख रक्कम, काही कपडे चोरून नेले आहे. यात पाच हजार रुपयांचे जिन्सच्या 10 पॅन्टी, व तीस हजारांची रोख रक्कम चोरीला गेली आहे.

Back to top button